Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांना ठिय्या आंदोलन भोवलं; धंगेकरांसह 35 ते 40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव गोळा केल्या प्रकरणी धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. भाजपावरती पैसे वाटप केल्याचा आरोप करत धंगेकर यांनी मतदानाच्या आदल्या दिशवी ठिया आंदोलन केलेलं होतं. ते आंदोलन करणं धंगेकरांना चांगलंच महागात पडलं आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात धंगेकरांसह 35 ते 40 कार्यकर्त्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटप करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची नावे सांगूनही त्यांच्यावर कसलीही कारवाई पोलीस करत नसल्याने सहकारनगर पोलीस ठाण्यातच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रविवारी ठिय्या आंदोलन केलं होतं. यावेळी महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा धंगेकर यांनी घेतला होता.
घराघरात पैसे वाटले जात आहेत. विविध मार्गाने जनतेचा हडप केलेला पैसा या निवडणुकीत वापरून जिंकू असे भाजपला वाटत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पैसे वाटले जात आहेत. आजी-माजी नगरसेवक यांच्यापासून ते भाजपचे वरिष्ठ नेते यात गुंतले आहेत. याची माहिती आम्ही पोलिसांना दिली. पैसे वाटणाऱ्यांची नावं सांगितली. तरीही त्यांच्यावर कारवाई नाही. त्यामुळे आम्ही गप्प राहणार नाही. आम्हाला लोकशाही वाचवायची आहे. आम्हाला संविधान वाचवायचे आहे. निवडणुका पैसे वाटून नव्हे तर लोकशाही पद्धतीने व्हाव्यात, हीच आमची भूमिका आहे, असं आंदोलनावेळी धंगेकर म्हणाले होते.
भाजपकडूनही ठिय्या...
धंगेकरांचं आंदोलन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मतदानाच्या दिवशी भाजपकडूनही धंगेकरांच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. मतदानाच्या दिवशी कोणत्याही बुथवर उमेदवाराचा फोटो किंवा पक्षाचं चिन्ह होतं. असं करुन कॉंग्रेस मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत भाजपकडून करण्यात आला होता.
पुण्यात रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ तगडी लढत
पुण्यात रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ तगडी लढत आहे. दोघांचंही भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. पुण्यात एकूण 53.54 टक्के मतदान झालं आहे. 11 लाख 3 हजार 678 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
इतर महत्वाची बातमी-
Pune Crime News : ज्योतिषींनीच गंडवलं! जादुटोण्याच्या नावाने पुण्यात महिलेला घातला 15 लाखांचा गंडा