काय? 79 कोटींचे वीजबिल! लघुउद्योजकास महावितरण विभागाचा झटका!
लॉकडाऊनमध्ये कंपनी बंद असूनही पिंपरी चिंचवड मधील एका लघुउद्योजकास महावितरण विभागाने विजेचा धक्का दिलाय. महावितरणने एक-दोन लाखांचे नव्हे तर तब्बल 79 कोटी 7 लाखांचं बिल थोपवलं आहे.
पिंपरी चिंचवड : शहरातील एका लघुउद्योजकास महावितरण विभागाने विजेचा धक्का दिलाय. लघुउद्योजक बाबू जॉन यांच्या हातात महावितरणने एक-दोन लाखांचे नव्हे तर तब्बल 79 कोटी 7 लाखांचं बिल थोपवलं आहे. लॉकडाऊनमुळं बाबू जॉन यांची साई प्रोफाईल कंपनी अडचणीत आहे. अशात महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराने त्यांना दुहेरी झटका दिलाय. 29 जूनपर्यंत हे बिल अदा न केल्यास बाबूंना आणखी एक कोटींचे बुर्दंड बसणार आहे. त्यामुळं बाबूंनी हातातील कामं बाजूला ठेवत पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेकडे धाव घेतलीये. संघटनेने महावितरण विभागाशी संपर्क साधला. लॉकडाऊनमुळं तीन महिने मीटरचे रिडींग घेणे बंद होते, ते या महिन्यात घेण्यात यात गफलत झाली. असं कारण महावितरणने पुढे केले आहे.
भोसरी एमआयडीसीच्या सेक्टर 10मध्ये बाबूंची साई प्रोफाईल ही कंपनी आहे. ते प्लॅस्टिक मोल्डस आणि टूल्सची निर्मिती करतात. लुमॅक्स, वॅरॉक सारख्या कंपन्यांना ते पुरवठा करतात. गेल्या सहा वर्षात अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी तग धरलाय. यात विजेचा खंड पडणे ही मोठी अडचण आहे. अनेकदा वीज गायब होते तर काही वेळा विजेचा दाब कमी असतो. या व्यत्ययांवर मात करत ते काम पूर्ण करतात. या कामाला लागणाऱ्या विजेचे बिल हे आत्तापर्यंत जास्तीतजास्त दोन लाखांच्या घरात आले. त्यातच कोरोनाने शिरकाव केल्याने 22 मार्चपासून कंपनी बंद आहे. मीटर रिडींग घेणाऱ्या व्यक्तीकडून कोरोना फैलू शकतो, त्यामुळे रिडींग घेणं ही बंद होतं. अशात साई प्रोफाईल कंपनीला मार्च महिन्याचे 88 हजार 197 रुपये तर एप्रिल महिण्याचे बिल अवघे 11 हजार 739 इतके वीजबिल आले.
कोरोनाच्या संकटात वीज दर कपातीचा निर्णय, उर्जामंत्री नितीन राऊन यांची माहिती
तब्बल 79 कोटी 7 लाखांचे वीजबिल लॉकडाऊनमध्ये कामकाज बंद असल्याने बाबूंना लाखोंचा फटका बसला. मग तब्बल पंचावन्न दिवसांच्या विश्रांतीनंतर 15 मे ला कंपन्या सुरू करण्याला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला. बांबूच्या जीवातजीव आला. आता उलाढाल सुरू झाल्याने वीजबिल अधिकचं येईल याची कल्पना ही बाबूंना होतीच. त्यानुसार 20 जून रोजी बांबूच्या हातात वीजबिल पडलं आणि त्यांना मोठा धक्का बसला. कारण हे बिल एक-दोन लाखांचं नव्हे तर तब्बल 79 कोटी 7 लाखांचे होते. त्यात ही 29 जूनपर्यंत बिल अदा न केल्यास 80 कोटी 5 लाख रुपये भरावे लागणार होते. म्हणजे जवळपास एक कोटींचा बुर्दंड लागणार होता. आधीच मोठा फटका सहन करणाऱ्या बाबूंना महावितरण विभागाने दुहेरी झटका दिला होता.
महावितरण विभागाचा भोंगळ कारभार वीजबिल पाहून बाबूंना काय करावे सुचत नव्हते, शेवटी स्वतःला सावरत त्यांनी लघुउद्योजक संघटनेकडे धाव घेतली. संघटनेने याबाबत महावितरण विभागाला विचारणा केली. तेंव्हा बाबूंच्या साई प्रोफाईल कंपनीला सुधारित 84 हजार 950 रुपयांचे बिल देण्यात आलं. 79 कोटी 6 लाख रुपयांची तफावत यात आढळून आली. महावितरण विभागाच्या या भोंगळ कारभाराबाबत एबीपी माझाने कार्यकारी अभियंता राहुल गवारे यांच्याशी फोनवर बातचीत केली. तेंव्हा त्यांनी संबंधित विभागाकडून अधिकची माहिती घेतल्याचं सांगितलं. तेंव्हा लॉकडाऊनमध्ये मीटर रिडींग घेणं बंद होतं. याच महिन्यात पुन्हा मीटर रिडींग घेण्यास सुरुवात झाली असून रिडींगमध्ये गफलत आढळल्याचे सांगितले. चूक लक्षात आल्यानंतर साई प्रोफाईल कंपनीला सुधारित 84 हजार 950 रुपयांचे बिल देण्यात आलं आहे. असं स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आले.
महावितरण विभागाच्या या चुकीने साई प्रोफाईल कंपनीच्या मालकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला.
Mahavitaran | कोरोनामुळं महावितरण कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास 30 लाखांचं अनुदान