(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणी काही पोलिस अधिकाऱ्यांना देखील बडतर्फ करण्यात आलं होतं, मात्र, आता बडतर्फ केलेल्या पोलिसांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.
पुणे: पुण्यात काही दिवसांपुर्वी ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. या प्रकरणामध्ये कोण्या राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. ललित पाटील प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे देखील समोर आले होते. यात पोलिसांचा देखील हात असल्याचं उजेडात आलेलं होतं. शिवाय, ससूनमधील प्रशासनाला हाताशी धरून ललित पाटील हे रॅकेट चालवत होता. या प्रकरणामुळे सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात अनेकांवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी काही पोलिस अधिकाऱ्यांना देखील बडतर्फ करण्यात आलं होतं, मात्र, आता बडतर्फ केलेल्या पोलिसांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे, यामुळे आता पुन्हा एकदा याबाबत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुणे: ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात पोलीस खात्यातून बडतर्फ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पुन्हा पोलिस दलात रुजू झाले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्यासह चौघा जणांची पुन्हा पोलीस दलात नियुक्ती करण्यात आली आहे.पुण्यातील ससून हॉस्पिटल मधून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मदत केल्याच्या आरोपावरून पोलीस उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे, पोलीस हवालदार राजेश जनार्दन काळे, नाथाराम भारत काळे, दिगंबर विजय चंदनशिव आणि अमित सुरेश जाधव यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं.
परंतु आता या बडतर्फ केलेल्या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा गृह विभागाने पोलीस दलामध्ये समाविष्ट करून घेतलं असल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील ड्रग्जची तस्करी करत होता. या ड्रग्ज प्रकरणात ललित पाटील याच्यासोबत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तस्करीत सहभाग आढळल्या प्रकरणात त्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं, आता यांना पुन्हा पोलीस दलाच्या सेवेत समाविष्ट करून घेतल्याने खळबळ उडाली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यात ससून रुग्णालयातून ड्रग्जची तस्करी करणारा ललित पाटील पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना पळून गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी कर्तव्यात कसूर केला असल्याचा ठपका ठेवत आणि ललित पाटीलला पळून जाण्यास मदत झाल्याच्या आरोपावरून पोलीस उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे, पोलीस हवालदार रमेश जनार्दन काळे ,नाथाराम भारत काळे, दिगंबर विजय चंदनशिव आणि अमित सुरेश जाधव यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं.
यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे धाव घेतली होती. या प्रकरणातील सुनावणी पार पडली.यावेळी त्यांना पुन्हा सेवेत पुनर्स्थापित करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना पुन्हा एकदा पुणे पोलीस दलाच्या आस्थापनेवर घेण्यात आलं आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियंत्रण कक्ष आणि पोलीस मुख्यालय या ठिकाणी त्यांची नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरणा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.