Pune News: एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; क्रिकेट खेळताना दम लागून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू
क्रिकेट खेळताना दम लागून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्य़ाची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील हडपसर परिसरातील हांडेवाडी या मैदानावर ही घटना घडली आहे.
Pune News: क्रिकेट खेळत असताना अचानक दम लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर परिसरातील मैदानावर घडली आहे. श्रीतेज सचिन घुले असं या मृत्यूमुखी पडलेल्या 22 वर्षीय मुलाचं नाव आहे. हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील मैदानावर ही घटना घडली.
नेमकं काय घडलं?
रविवारी श्रीतेज हा सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. पुण्यातील हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील मैदानावर 22 वर्षीय श्रीतेज घुले क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळत असताना अचानक दम लागल्याने तो खाली कोसळला. श्रीतेजच्या इतर मित्रांनी त्याच्यावर त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. श्रीतेज काहीच प्रतिसाद देत नसल्याचं इतर मित्रांना लक्षात येताच त्यांनी श्रीतेजला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
श्रीतेजच्या कुटुंबीयांना यासंदर्भात माहिती दिल्यावर त्यांना धक्का बसला. त्याच्या आकस्मित निधनानाने हडपसर परिसरात शोककळा पसरली आहे. श्रीतेज आणि त्याचा परिवार हडपसर परिसरात राहतात. त्याला मोठा मित्रपरिवार देखील आहे. घरातून सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी निघालेला श्रीतेज घरी कधीच पोचणार नाही, असं कुटुंबीयांना देखील वाटलं नव्हतं. मात्र काही तासातच होत्याचं नव्हतं झालं. श्रीतेजच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.