Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर वाढला, खडकवासला धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Maharashtra Rain Update : पुण्यात पावसाचा जोर वाढला असून पुढच्या 24 तासांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे : जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याने खडकवासला धरणातून (Pune Khadakwasla Dam) पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणातून 2000 क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नदीकाठी विविध ठिकाणी सायरन वाजवून नदीपात्रात येऊ नये अशा प्रकारचं आवाहन करण्यात येत आहे.
खडकवासला धरण परिसरात होत असलेला पाऊस आणि खडकवासला धरणामध्ये येत असलेल्या पाण्याचा प्रमाण पाहता खडकवासला धरणातून 19 जून रोजी दुपारी 1 वाजता 2 हजार क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण पाहता या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिका परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
Khadakwasla Dam Water Release : पुढील 24 तासांमध्ये पुण्यात मुसळधार पाऊस
भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासाकरिता पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Pune Rain Update : इंद्रायणी नदीच्या पातळीत वाढ
पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत इंद्रायणी नदीचं पाणी पोहोचलं आहे. मंदिरात जाण्यासाठी भक्तिसोपान पुलाचा वापर केला जातो. मात्र आजचा पावसाचा जोरच एवढा आहे, की या पुलाचं रेलिंग तुटून वाहून गेलं. त्यामुळे मंदिरात पोहोचण्यासाठी वारकरी पाण्यातून वाट काढून जात आहेत. पोलिस त्यांना मदत करत आहेत. मात्र हे धोकादायक आहे असं अनेक स्थानिक लोक सांगत आहेत.
मावळ, लोणावळा, कामशेत या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाण्याची पातळी हळूहळू वाढताना दिसत आहे.
Maharashtra Rain Update : चांदखेड-आढले गावाचा संपर्क तुटला
पुण्याच्या मावळमधील चांदखेड गावातही अतिवृष्टीचे परिणाम जाणवत आहे. चांदखेड-आढले गावाचा संपर्क तुटलेला आहे. या मार्गावरील ओढे-नाले आता प्रवाह सोडून वाहत आहेत. त्या ओढ्या-नाल्यातील पाण्यामुळं रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आपल्या शेतात जाणं कठीण झाल्याचं दिसून येतंय.
ही बातमी वाचा:
- Pune Heavy Rainfall : पुण्यात धो-धो पाऊस, रस्त्यांपासून वस्त्यांपर्यंत पाणीच पाणी, खडकवासला धरणातून पहिल्यांदा होणार पाण्याचा विसर्ग























