''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
दुष्काळ परिस्थिती, मुख्यमंत्र्यांची मराठावाडा बैठक, पुणे अपघात, विशाल पाटील कारवाई, शेतकरी आत्महत्या या विषयांवर एबीपी माझाशी संवाद साधला.
भंडारा : पुणे कार अपघात (Accident) प्रकरणाने राजकीय वातावरणही ढवळून निघालं आहे. बड्या उद्योगपतीच्या मुलाने 2 निष्पाप जीव घेतल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. मात्र, पुण्यातील वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) यांनी मध्यरात्री पोलिस ठाण्या धाव घेतल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. आमदार व नेतेमंडळीही बड्या बापासाठी धावाधाव करतात, सर्वसामान्यांना कुणी वालीच नाही, असा संतप्त सवालही सोशल मीडियातून विचारला जाऊ लागला. त्यातच, पुण्यातील काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनीही हे प्रकरण चांगलेच लावून धरले. पुणे पोलिसांच्या कार्यक्षमेतवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर, अनेक दिग्गज नेत्यांनी याप्रश्नी आवाज उठवला. आता,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल केला आहे.
राज्यातील विविध घटनांवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यामध्ये, दुष्काळ परिस्थिती, मुख्यमंत्र्यांची मराठावाडा बैठक, पुणे अपघात, विशाल पाटील कारवाई, शेतकरी आत्महत्या या विषयांवर एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी, पुणे अपघातावर बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. पुणे अपघातात आरोपीच्या मदतीसाठी गेलेला आमदार कोणत्या पवारांचा आहे, असे नानांनी म्हटले. ''पुण्यातील उद्योगपती अग्रवाल याच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न पवार यांचा आमदार करीत आहे. हा आमदार कोणत्या पवारांचा आमदार आहे? हे मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट करावे, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे. याबाबत काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांना एक पत्र देण्यात येत असल्याचंही'' पटोले यांनी म्हटलं.
दरम्यान, सांगलीचे काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांच्यावर निलंबनाच्या कारवाई संदर्भात दिल्लीच्या वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई होईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एबीपी माझा शी बोलताना व्यक्त केला.
नाना पटोलेंशी साधलेल्या संवादातीलमहत्वाचे मुद्दे
. महाराष्ट्रातील सरकारला महाराष्ट्रातील पाणी टंचाई असो अवकाळी परिस्थिती असो यासंदर्भात काहीही देणे घेणे नाही
. पैसा लावा आणि पैसा कमवा या विचाराचा महाराष्ट्रातील सरकार आहे
. यावर्षी महाराष्ट्रात पाणीटंचाई आणि दुष्काळ परिस्थिती राहू शकते हे नोव्हेंबर महिन्यातच सरकारला अवगत केलं होतं.
. मराठवाड्यातील पालकमंत्र्यांनी पैसा जास्त गमावला त्या पैशाची मस्ती करण्याकरिता ते गेले आहेत.
. निवडणूक काळामध्ये 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
. राज्य सरकारवर सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
. सरकारने आचारसंहितेचा बहाना आता बनवून नये
. पुण्यातील धनदांडगे व्यावसायिक अग्रवाल याच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करणारा आमदार समोर आला आहे, तो आमदार कोणत्या पवाराचा आहे? हे मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट करावं, असं त्यांना पत्र लिहिलं आहे.
. विशाल पाटील हे काँग्रेस विचारधारेचे आहेत, विश्वजीत कदम यांच्या परिवारातील ते आहेत. त्यांच्यावर कारवाईच्या पेक्षा राज्यातील परिस्थितीवर लक्ष केंद्रित घालावं असं मला वाटतं. विशाल पाटील यांच्या संदर्भात एआयसीसीकडे पत्रव्यवहार केला आहे.