Nilesh Rane : दाढी न काढण्याचा निर्धार ते राजकारणाला बाय बाय, निलेश राणेंनी राजकारण का सोडलं?
निलेश राणे (Nilesh Rane) हे माजी खासदार आहेत. ते 2009 मध्ये खासदार झाले. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती.
मुंबई : माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सक्रिय राजकारणातून कायमचं बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. निलेश राणे यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. "मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे,आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही", असं ट्विट निलेश राणे (Nilesh Rane Quits Politics) यांनी केलं. राज्यभरात आज दसरा मेळाव्याची (Dasara Melava) धामधूम सुरु असताना निलेश राणे यांनी हा निर्णय नेमका का घेतला याची चर्चा होत आहे. निलेश राणे यांच्या राजकीय निवृत्तीच्या कारणांचा उहापोह होईलच, पण बेधडक निलेश राणे यांच्या रोखठोक शपथेची आठवण झाल्याशिवाय आज राहणार नाही.
निलेश राणे हे माजी खासदार आहेत. ते 2009 मध्ये खासदार झाले. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. वयाच्या 28 व्या वर्षी ते खासदार झाले होते. मात्र पुढे राजकीय परिस्थिती बदलली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी निलेश राणे यांचा पहिल्यांदा पराभव केला.
दाढी न काढण्याचा निर्धार
दरम्यान, निलेश राणे यांना लोकसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागला होता. त्यांनी विनायक राऊत यांचा पराभव करण्याचा चंग बांधला. इतकंच नाही तर 2017 मधील एका कार्यक्रमात निलेश राणे यांनी, जोपर्यंत विनायक राऊत यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत दाढी न करण्याचा निर्धार केला होता.
त्या कार्यक्रमात नेमकं काय झालं होतं?
त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले नारायण राणे हे पक्षांतर करणार होते. त्यामुळे काँग्रेसने सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे समर्थकांचा वरचष्मा असलेली जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. यावरुन संतापलेल्या राणेंनी कोकणात आपली ताकद दाखवायला सुरु केली होती. काँग्रेसने सिंधुदुर्ग कार्यकारिणी बरखास्तीनंतर आक्रमक पवित्रा घेतलेल्या नारायण राणेंनी कुडाळमध्ये सभा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याआधी त्यांनी गोवा ते कुडाळ असं शक्तिप्रदर्शन केलं.2017 च्या या कुडाळमधील सभेत माजी खासदार निलेश राणेंनीही कार्यकर्त्यांना संबोधलं. शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय दाढी काढणार नसल्याची प्रतिज्ञा माजी खासदार निलेश राणेंनी घेतली होती.
निलेश राणेंनी राजकारण का सोडलं?
दरम्यान, निलेश राणे यांनी आता सक्रिय राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे, पण त्यामागची कारणं काय याची चाचपणी सगळीकडे सुरु आहे. कोकणात सध्या उमेदवारीवरून अनेक अंतर्गत घडामोडी घडत आहेत. त्यामुळेच निलेश राणेंनी हा निर्णय घेतलेला असू शकतो.
निलेश राणे हे यावेळी लोकसभाऐवजी विधानसभा निवडणुकीची तयारी करत होते, अशी माहिती आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ मालवण (Kudal Malvan Vidhan Sabha Election) या विधानसभा मतदारसंघातून लढण्याची त्यांची तयारी होती. सध्या कुडाळ मालवण मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक (Vaibhav Naik) विद्यमान आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांनी विद्यमान केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांचा पराभव केला होता. वैभव नाईक हे 2014 आणि 2019 असे दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत.