Vijaysinh Mohite Patil: पुण्यात शरद पवारांना भेटून विजयसिंह मोहिते-पाटील बाहेर पडले, पण पक्षप्रवेश लांबला, नवा मुहूर्त कधी?
Maharashtra Politics: पुण्यातील कोंढव्यामध्ये माजी आमदार महादेव बाबर यांच्या मुलाचा लग्नसोहळा बुधवारी पार पडला. या लग्नसोहळ्याला राजकीय वर्तुळातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटलांची भेट

पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि माढा या लोकसभा मतदारसंघांमध्ये ताकद राखून असलेले मोहिते-पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी बुधवारी पुण्यात धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर मोहिते-पाटील घराण्याच्या सदस्यांकडून तुतारी हाती घेण्याची भाषा सुरु झाली होती. या घडामोडींची चर्चा सुरु असतानाच बुधवारी संध्यकाळी पुण्यातील (Pune) एका लग्नसमारंभात शरद पवार (Sharad Pawar) आणि विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये थोडीफार चर्चाही झाली. त्यामुळे मोहिते-पाटील पुन्हा शरद पवार यांच्या साथ देणार, या दाव्याला आणखीनच बळकटी मिळाली. परंतु, मोहिते-पाटील यांचा शरद पवार गटातील नियोजित पक्षप्रवेश लांबणीवर पडल्याची चर्चा आहे. यामगील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, मोहिते-पाटील गुरुवारी शरद पवार गटात प्रवेश करणार होते. परंतु, त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. येत्या तीन-चार दिवसांमध्ये शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मोहिते-पाटील शरद पवार गटात प्रवेश करतील, असे सांगितले जाते.
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील काय म्हणाले?
या लग्नसमारंभातून बाहेर पडल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांना प्रसारमाध्यमांचा गराडा पडला. पत्रकारांनी त्यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, विजयसिंह मोहिते-पाटील यांनी बहुतांश प्रश्नांवर मौन बाळगणे पसंत केले. धैर्यशील मोहितेंना उमेदवारी दिली नाही म्हणून तुमची नाराजी आहे का ?, असा एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर विजयसिंह मोहिते यांनी होकारदर्शक मान हलवली. मात्र, मोहिते-पाटलांचं अजून काही ठरलेलं नाही, असेही त्यांनी म्हटले. पुण्यातील कोंढवे येथे माजी आमदार महादेव बाबर यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यासाठी सर्व राजकीय नेते एकत्र आले होते. या सोहळ्याला संजय राऊत, हर्षवर्धन पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, श्रीनिवास पाटील यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
आणखी वाचा
मोठी बातमी! शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का, मोहिते पाटील हाती घेणार तुतारी, लवकरच होणार पक्षप्रवेश























