(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभेची निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर, 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) बिगुल अखेर वाजले आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर, 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. आज निवडणूक आयोगाने (Election Commission) याबाबत पत्रकार परिषद घेत घोषणा केली. यावरून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठा दावा केलाय.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, निवडणूक जाहीर होण्याची वाट महाराष्ट्रातील जनता पाहत होती. निवडणूक होत आहे याचा आनंद आहे. हरियाणात जिंकल्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक होत आहे. नाही तर राष्ट्रपती राजवट लावली असती. महाराष्ट्र बुडवण्याचे काम करणाऱ्यांना जनता बुजवण्याचे काम करेल, असे त्यांनी म्हटले आहे.
सरकारकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम
ते पुढे म्हणाले की, आम्हाला अनकुल परिस्थिती आहे. हे सरकार 30 टक्क्यांपर्यंत कमिशन घेत होते. मतदार यांना माफ करणार नाही. निवडणुकीत पैशाचा पाऊस पडेल. मात्र जनता बळी पडणार नाही. महाविकास आघाडीचे 222 जागांवर एकमत झाले आहे. दोन दिवसांनी पुन्हा बैठक होणार आहे. दिल्लीत उद्या स्क्रिनिंग कमिटीची बैठक आहे, त्यात निर्णय होईल. निवडणूक आधीच होणे अपेक्षित होते. मात्र, सरकार घाबरलेले होते. सरकारने लोकांना फसवणारे निर्णय घेतले. सरकारी पैशातून जाहिराती करुन त्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला. आजची जाहिरात आम्ही पाहिली. त्यात तेलगंणातील योजना बंद असून सरकारने जाहिरात दिली. फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम केले गेले.
जनता यांचा भोंगा वाजवल्याशिवाय राहणार नाही
दोन दिवसांत आमच्या पाच गॅरंटी जाहीर होणार आहे. कोण महिलांना फसवतंय ते स्पष्ट होईल. शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देणारी योजना आम्ही आणली. मात्र ती बंद पाडण्यात आली. या योजनेबरोबर महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असेल. कमी कालावधी मिळावा हा प्लॅनिंग होता. नवीन शासन निर्णय काढण्यासाठी आणि बोगस कामाचे भूमिपूजन करण्यासाठी ही निवडणूक लांबणीवर नेली का? 40 दिवसांचा कमीत कमी कालावधी असला पाहिजे. मात्र 35 दिवसात निवडणूक घेत आहेत. जनता यांचा भोंगा वाजवल्याशिवाय राहणार नाही. रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात आम्ही तक्रार केली होती.मात्र तळ राखेल तो पाणी चाखेल. जर तळ चाखायची जबाबदारी दिली असेल तर मग काय? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला.
नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला झटका बसणार
ते पुढे म्हणाले की, आज सात आमदारांचा शपथविधी झाला. कायदा गुंडाळून काम सुरु आहे. नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला महाराष्ट्रातील निवडणूक झाल्यानंतर झटका बसेल. भाजपला संविधानाची आठवण राहुल गांधी यांनी करुन दिली. मोदींना डोक्याला संविधान लावावं लागतंय. आज आचारसंहिता लागणार त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील मुख्यमंत्र्यांचे नाव हटवले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गरज आता संपली आहे , असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
आणखी वाचा
Manoj Jarange : लोकसभेपेक्षा जास्त ताकद लावा, विधानसभेला फडणवीसांची जिरवा; मनोज जरांगेंचा आदेश सुटला