Vasnat More: तात्यांनी पक्ष सोडताच पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांचे धडाधड राजीनामे, पण वसंत मोरे म्हणाले...
Pune MNS: मी परतीचे दोर स्वत: कापले, पुणेकर माय-बाप समजून घेतील, वसंत मोरे ढसाढसा रडले, वसंत मोरे पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले. वसंत मोरे यांनी पक्ष सोडल्यानंतर मनसेचे अनेक स्थानिक पदाधिकारी त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे.
पुणे: मनसेचे पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी मंगळवारी पक्ष सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा देत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. गेल्या काही वर्षांपासून वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जात होते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे वसंत मोरे (Vasant More) हे नाराज होते. आपल्याला पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांना आणि कार्यक्रमांना आमंत्रित केले जात नव्हते, डावलले जात होते, ही खंत वसंत मोरे यांनी अनेकदा बोलूनही दाखवली होती. अखेर आज त्यांनी सोशल मीडियावरुन मनसेला (MNS) रामराम ठोकत असल्याचा निर्णय जाहीर केला. पुण्यातील (Pune) राजकीय वर्तुळात वसंत मोरे यांना 'तात्या' या नावाने ओळखले जाते. तात्यांच्या राजीनाम्याने मनसेच्या अंतर्गत गोटात भूकंप आला आहे. वसंत मोरे यांनी पक्ष सोडल्यानंतर मनसेचे अनेक स्थानिक पदाधिकारी त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे.
वसंत मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचे सांगितले. आतापर्यंत मनसेच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी फेसबुक आणि व्हॉटसअॅपवर माझ्याकडे राजीनामे पाठवले आहेत. पण मी कोणावरही पक्ष सोडण्याची सक्ती केलेली नाही. हा वसंत मोरेवर झालेला अन्याय आहे, असे त्यांना वाटत आहे. तरीही मी या सगळ्यांना कोणीही पक्षसंघटना सोडू नका, असे सांगितले आहे. यापुढे पक्ष सोडायचा की नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे वसंत मोरे यांनी म्हटले.
पुण्यातील मनसेच्या कार्यकारिणीने राज ठाकरेंना चुकीचा रिपोर्ट दिला: वसंत मोरे
या पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांनी मनसेच्या पुणे शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. पुण्यातील मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरे यांच्याकडे चुकीचा अहवाल पाठवला. मनसे पुणे लोकसभा मतदारसंघात लढू इच्छित नाही, ही धक्कादायक बाब आहे. पुण्यात मनसेची ताकद नाही, असे वातावरण पक्षाच्याच नेत्यांनी तयार केले. राज ठाकरे पुण्यात आले होते त्यापूर्वी काही नेत्यांनी शाखाध्यक्षांच्या मिटींग घेतल्या. त्यांना सांगण्यात आले की, राज ठाकरेंनी तुमची बैठक घेतली तर त्यांना सांगा शहरात जेमतेम वातावरण आहे. मनसेने निवडणूक लढवण्यासारखे वातावरण नाही. मनसैनिकांनी पुण्याची लोकसभा निवडणूक लढवायची आहे, पण नेत्यांना नाही. त्यामुळे मनसेच्या काही नेत्यांकडून मुंबईला चुकीचा अहवाल पाठवण्यात आला, असा आरोप वसंत मोरे यांनी केला. पुण्यातील महाराष्ट्र सैनिक मला लाईक करतात, इतर नेत्यांना लाईक करत नाहीत, हीच त्यांची खरी अडचण आहे. मी पुण्याचा शहराध्यक्ष असताना पक्षसंघटना वाढवली तीच संघटना आता संपवण्याचे काम मनसेच्या स्थानिक नेत्यांकडून सुरु असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.
आणखी वाचा
पवारांसोबतची 'ती' दोन मिनिटांची भेट निर्णायक ठरली? वसंत मोरे आता शरद पवार गटात जाणार का?