Uttarakhand Political Crisis: त्रिवेंद्रसिंग रावत यांचा उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याविरोधात पक्ष आणि विधिमंडळात बंडखोरीचे संकट अधिकच तीव्र झाले होते. नोकरशाही लोकप्रतिनिधींचे ऐकत नाहीत आणि आमदारांनाही आदर मिळत नाही, असा आरोप मंत्री व आमदार बराच काळापासून करत आहेत.
देहरादून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजभवन येथे राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, उत्तराखंडमधील नेतृत्व बदलण्याचा निर्णय भाजप हाय कमांडने घेतला आहे. यासंदर्भात रावत यांना दिल्ली येथे बोलवण्यात आले. अखेर दिल्लीहून परत आल्यानंतर त्यांनी हे पद सोडले.
निरीक्षकांच्या अहवालानंतर भाजपने त्रिवेंद्र रावत यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्याचा निर्णय घेतला. आता राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांसाठी लवकरच विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात येणार आहे. या बैठकीत नवीन नेत्याची निवड केली जाईल.
ही नावं मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत पुढे
राज्यसभेचे खासदार अनिल बलूनी, नैनीतालचे लोकसभेचे खासदार अजय भट्ट आणि धनसिंग रावत उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे आहेत. तिघांपैकी कोणालाही नवीन मुख्यमंत्री केले जाऊ शकते. या संदर्भात सतपाल महाराज यांनी संघाच्या प्रमुख नेत्यांची भेटही घेतली होती. नव्या मुख्यमंत्र्यांसाठी सतपाल महाराजांच्या नावाचीही चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.
- उत्तराखंडमध्ये कोणत्याही भाजप मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण होऊ शकला नाही
- सन 2000 मध्ये उत्तराखंडची स्थापना झाल्यानंतर, भाजपने 2 वर्षात 2 मुख्यमंत्री केले (नित्यानंद स्वामी आणि भगतसिंग कोश्यारी).
- 2002 मध्ये काँग्रेसचा विजय झाला
- 2007 मध्ये पुन्हा भाजपाला बहुमत मिळाले
- 2007 ते 2012 दरम्यान भाजपने उत्तराखंडमध्ये 2 मुख्यमंत्री बदलले (बीसी खंडूरी आणि रमेश पोखरियाल 'निशंक')
- 2017 मध्ये पुन्हा भाजपचे सरकार स्थापन झाले, त्रिवेंद्रसिंग रावत मुख्यमंत्री झाले.
- 4 वर्षानंतर पुन्हा मुख्यमंत्री बदलला जातोय