(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uttam Jankar on Ajit Pawar : 'अजित पवारांना पुन्हा राष्ट्रवादीत घेऊ नये, प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होईल'; उत्तम जानकरांचा घणाघात
Uttam Jankar Slams Ajit Pawar : अजित पवार परत राष्ट्रवादीत आले तर त्यांना घेऊ नये. त्यांना पुन्हा पक्षात घेतले तर प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, अशी टीका उत्तम जानकर यांनी केलीय.
Uttam Jankar on Ajit Pawar : अजित पवार परत राष्ट्रवादीत आले तर त्यांना घेऊ नये. त्यांना पुन्हा पक्षात घेतले तर प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, असे म्हणत धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला. त्यांना एकाच जागेवर विजय मिळवता आला. तर, शरद पवार गटाने आठ जागांवर बाजी मारत विजयी गुलाल उधळला. लोकसभेच्या निकालानंतर अनेक नेत्यांची शरद पवार गटात इनकमिंग सुरू आहे. तर काही नेते घरवापसी करत आहेत. यावरून उत्तम जानकर यांनी अजित पवारांना डिवचले आहे.
उत्तम जानकरांचा अजित पवारांवर निशाणा
सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. अनेक आमदार घरवापसी करत आहेत. अजित पवारांची हालचाल तशी दिसून येत आहे का? असे विचारले असता उत्तम जानकर म्हणाले की, चर्चा तर तसे सुरूच आहे. पण माझं मत आहे की, अजित पवारांना पुन्हा पक्षात घेऊ नये, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्यांना पुन्हा पक्षात घेतले तर प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, असे त्यांनी यावेळी म्हटले.
लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर टीका
लाडकी बहीण योजनेच्या कितपत फायदा होईल, असे विचारले असता उत्तम जानकर म्हणाले की, यापुढे सरकार चालवता येऊ नये अशा पद्धतीचे धोरण या दोन महिन्यात राबवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. ही लाडकी बहीण योजना नसून, लाडकी खुर्ची योजना असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये असल्याचे म्हणत उत्तम जानकर यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला.
आरक्षणावर पवार साहेबच तोडगा काढू शकतात
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे महाराष्ट्रातील वातावरण चिघळत चालले आहे. याबाबत विचारले असता उत्तम जानकर म्हणाले की, या प्रकरणाचे औषध जर कोणाकडे असेल तर ते निश्चित शरद पवार साहेबांकडेच आहे. सरकारला वाटत होतं की, आम्ही सगळ्यांनाच खेळत ठेऊ. मराठ्यांचा आणि ओबीसींचा राजकीय फायदा करून घेऊ. मात्र, आता राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसह नेत्यांनाही वाटत आहे की, मराठा आणि ओबीसी आरक्षणावर पवार साहेबच तोडगा काढू शकतात, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
Video : ''ते नसतानाही पुण्यात धरण वाहिलंय''; राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला, पूरस्थितीवरुन निशाणा