Uddhav Thackeray: अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही, ज्यांना जायचंय त्यांनी जा; उद्धव ठाकरेंनी पक्षातील नाराजांना सुनावलं
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी नुकत्या झालेल्या एका बैठकीत पक्षातील नाराजांना रोखठोक भाषेत इशारा दिला. नाराजांना खुलेआम निघून जाण्याची ऑफर, म्हणाले...
मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटातून मोठ्याप्रमाणावर पक्षांतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही. ज्याला जायचं आहे त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही, पक्षाचा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
मातोश्रीवरील ठाकरे गटाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेकांना नाराजी व्यक्त केली होती. आपल्याला निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही, अशी खंत अनेकांना बोलून दाखवली होती. विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या प्रचंड यशानंतर ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक पक्षांतर करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. पक्षात नाराजीचा सूर आवळणाऱ्या माजी नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांसमोर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकीनंतर काही शिवसैनिक पदाधिकारी ठाकरेंचे शिवसेनेला सोडून गेले. त्यानंतर आता काहींनी नाराजीचा सूर आवळला आहे त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नेमकं काय घडलं?
अलीकडेच मुंबईतील निवडणुकीच्या तयारासाठी मातोश्रीवर ठाकरे गटाची आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीत अनेक जुन्या नगरसेवकांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. मातोश्रीवर होणाऱ्या पदाधिकारी आढावा बैठकीत देखील माजी नगरसेवकांना बोलवले जात नाही. विधानसभा निवडणुकीत देखील विधानसभा मतदार संघात उमेदवार देताना माजी नगरसेवकांना विश्वासात घेतले नव्हते, अशी तक्रार एका नगरसेवकाने केली होती.
एकसंध शिवसेना असताना पक्षाचे नगरसेवक इतक्या उघडपणे नाराजी व्यक्त करण्याची हिंमत करत नव्हते. मात्र, विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे आता पक्षातील नाराजांना उघडपणे नेत्यांच्या धोरणांवर टीका करण्याचा आत्मविश्वास आल्याचे दिसत आहे. यापैकी अनेकजण आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजप किंवा शिंदे गटाची वाट धरू शकतात. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश पाहता बहुतांश नाराज नगरसेवकांची पसंती भाजपला असल्याची चर्चा आहे.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ किती?
2017 साली ठाकरे गटाचे एकूण 84 नगरसेवक निवडून आले होते. नंतरच्या काळात मनसेच्या 6 नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश केला. तर 2 नगरसेवक कोर्टातील प्रक्रियेच्या माध्यमातून निवडून आले होते. मविआ सरकारच्या काळात 7 अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. या सगळ्याची गोळाबेरीज करुन शिवसेनेकडे 99 नगरसेवकांचे संख्याबळ आहे.
आणखी वाचा