Uddhav Thackeray: काँग्रेस जास्त मुलं असलेल्यांना संपत्ती वाटते, मग मोदींनी 10 वर्षात कमी मुलं असलेल्यांना का पैसे वाटले नाहीत? उद्धव ठाकरे
Maharashtra Politics: पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच काँग्रेस पक्षावर टीका केली होती. काँग्रेस सत्तेत आल्यास तुमची संपत्ती जास्त मुलं असणाऱ्यांना वाटेल, असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले होते.
अमरावती: भाजप आणि शिवसेनेची युती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात कितीवेळा आले, याची आकडेवारी बघा. पण आता पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रातील गल्लीबोळात फिरत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक सभेत पंतप्रधान मोदी (PM Modi) जातीय समीकरण पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकत्याच झालेल्या एका सभेत मोदींनी काँग्रेसवर (Congress) आरोप करताना म्हटले की, काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर जास्त मुलं असणाऱ्यांना सगळी संपत्ती वाटून टाकतील. पण मग पंतप्रधान मोदी 10 वर्षांपासून सत्तेत होते. मग त्यांनी कमी मुलं असणाऱ्यांना संपत्ती का वाटली नाही?, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विचारला. देशातील प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन हवेत विरुन गेले, याची आठवणीही उद्धव ठाकरे यांनी करुन दिली. ते सोमवारी अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
मुळात कोणाला जास्त मुलं होतात आणि कोणाला कमी मुलं होतात, हे पंतप्रधान मोदींना कसे कळते, हे देव जाणे. ते पंतप्रधान आहेत, कदाचित त्यांच्याकडे तशी यंत्रणा असेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. ही निवडणूक आपल्यासाठी जगण्यामरण्याचा प्रश्न आहे, आपल्याला स्वातंत्र्यात जगायचं आहे की पारतंत्र्यात जगायचं आहे, याचा फैसला करणारी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सगळे उद्योग गुजरातला नेले, महाराष्ट्राबद्दल इतका आकस का? उद्धव ठाकरेंचा सवाल
या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, विदर्भाचा विकास तुम्ही १० वर्षात का केला नाही? एकही उद्योग तुम्ही राज्यात का आणला नाही विदर्भात का आणला नाही? सगळे उद्योग गुजरातला, एवढा महाराष्ट्र बद्दल आकस का? हे तुम्हला अंगठे दाखवताय, मिळत काही नाही. आम्हाला भारत सरकार हवय, मोदी सरकार नको, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
केंद्रीय अर्थमंत्री सीताराम बाई म्हणतात माझ्याकडे पैसे नाहीत मी निवडणूक लढाणार नाही. पण म्हणतात निवडणूक रोखे परत आणणार. तुम्ही भाजप आणि काँग्रेसच्या खात्यातले पैसे काढा म्हणजे कळेल कोणी देशाला लुटलं? यांनी 70 वर्षात लुटलं नाही तेवढं यांनी अडीच वर्षात देशाला लुटले. मोदी गॅरेंटी म्हणजे भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या. त्यामुळे आता तुम्हाला मोदी गॅरेंटी आणि उद्धव ठाकरे वचन यापैकी काय हवंय तुम्ही निवडा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
भाषणाच्या शेवटी निवडणूक आयोगाला आव्हान
केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या प्रचारगीतामधील 'हिंदुत्त्व' आणि 'भवानी' या शब्दांवर आक्षेप घेतला होता. यासंदर्भात ठाकरे गटाला नोटीसही पाठवण्यात आली होती. त्याच अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी आज भाषणाच्या शेवटी 'जय भवानी, जय शिवाजी', अशा घोषणा देत केंद्रीय निवडणूक आयोगाला एकप्रकारे आव्हान दिले. यावर आता निवडणूक आयोग काही कारवाई करणार का, हे आता पहावे लागेल.
आणखी वाचा
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्यानेच ‘जय भवानी’ शब्द काढायला लावला असेल, चित्रा वाघ यांची खोचक टीका