(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray : विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Mumbai Lok Sabha Election : मतदान केंद्रावर अधिकारी हे मतदारांना जाणूनबूजून ताटकळत ठेवत असून मतदान केंद्राच्या बाहेर लांबच लांब रांगा दिसत आहेत. त्यामुळे अनेक मतदार कंटाळून परत जात असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई: ठाकरे गटाला ज्या ठिकाणी मतदान जास्त पडतंय त्या ठिकाणी केंद्रावर जाणूनबूजून विलंब केला जातोय, मतदारांना मुद्दामून ताटकळत ठेवल्याचं दिसतंय असा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. कितीही वेळ लागला तरी मतदारांनी मतदान करावं असं आवाहनही त्यांनी केलं. उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी मतदारांना हे आवाहन केलं.
अधिकाऱ्यांकडून जाणूनबूजून वेळकाढूपणा सुरू
मतदारांमध्ये उत्साह मोठा असून निवडणूक आयोगाकडून मतदान करण्याचं आवाहन केलं जातंय. मात्र अशातच निडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत असून पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, मतदान केंद्रावर जाणूनबूजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जातोय. मतदारांनी मतदानाला उतरवू नये, त्यांनी बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं यासाठी सरकारचा डाव आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला मतदानाला जाणून बूजून वेळ केला जातोय, त्यावेळी तुम्ही जवळच्या शिवसेना शाखेला त्याची माहिती द्या.
कंटाळून परत गेलेल्या मतदारांनी पुन्हा मतदान करायला जावं
मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्याचं दिसत असलं तरी मतदान करा. जे मतदार कंटाळून परत गेले आहेत त्यांनी पुन्हा केंद्रावर जाऊन मतदान करावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. ते म्हणाले की, ज्या मतदान केंद्रावर आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणाचा अनुभव आला असेल त्या ठिकाणच्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांचं नाव विचारावं, नोंद करावं. अशांची माहिती गोळा करून आम्ही कोर्टात जाऊ.
शेवटचा मतदार हा मतदान करत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग मतदान थांबवू शकत नाही, त्यामुळे वेळेच्या आधी मतदारांनी मतदान केंद्रात जावं आणि मतदान करावं असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मोदी सरकार पराभवाच्या भितीने पछाडलेलं आहेत असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. ते म्हणाले की, मतदानासाठी गेलेल्या अनेकांची नावं यादीमधून वगळली जाणे हा सरकारचा आवडता खेळ आहे. अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचंही समोर आलं आहे.
ही बातमीव वाचा: