... त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला होता; निकालानंतर वर्षा गायकवाड मातोश्रीवर, ठाकरेंची भेट, शिवसैनिकांचे आभार
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर वर्षा गायकवाड यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरेंकडून पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं.
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. त्यातच, विजयी खासदार पक्षाच्या नेतृत्वाची भेट घेऊन आभार मानत आहेत. तर, महाविकास आघाडी एका जीवाने लढली म्हणून हा विजय शक्य झाल्याचं महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar) यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले होते. त्यामुळे, महाविकास आघाडीचे (Mahavikas aghadi) नेते एकमेकांचे अभिनंदन करत आहेत. उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने काँग्रेस नेत्या आणि आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर, भाजपने देशभक्तीचा प्रचार करत उज्ज्वल निकम यांना येथून निवडणुकीच्या मैदानात उतरले. मात्र, वर्षा गायकवाड यांनी मोठा लीड तोडून विजय मिळवला.
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर वर्षा गायकवाड यांनी मातोश्रीवर जाऊmaन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरेंकडून पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. दरम्यान, यापूर्वीही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी, मी पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. तसेच, वर्षा गायकवाड यांना दिल्लीला पाठवणारच, माझ्या बहिणीसाठी माझे मत पहिल्यांदाच काँग्रेसला देणार असा शब्द ठाकरेंनी दिला होता. त्यामुळे, उद्धव ठाकरेंचं काँग्रेसला दिलेलं पहिलं मत वाया गेलं नाही. वर्षा गायकवाड यांच्या विजयासाठी काँग्रेससह शिवसैनिकांनीही मोठे कष्ट घेतले. त्यामुळेच, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे आभार माणण्यासाठी मी मातोश्रीवर आल्याचं वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना म्हटले.
उद्धव ठाकरेंनी पहिल्याच दिवशी मला बहीण म्हणून मतदान कारणार असल्याचं सांगितलं, त्याचं दिवशी विजय माझा निश्चित झालेला, असे म्हणत उद्धव ठाकरेंचा आपल्या विजयात मोठा वाटा असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सूचवलं आहे. तसेच, महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाबद्दलही त्यांनी जनतेचे आभार मानले. मुंबईतील 6 जागांपैकी 5 जागा आम्ही जिंकलो आहोत, आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन काम केल्याने हे यश मिळालं आहे, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, मुंबईतील 6 पैकी 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर, पियुष गोयल आणि रवींद्र वायकर हे महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, रवींद्र वायकर यांच्या विजयाबद्दल अद्यापही वाद असल्याने हा विजय आपलाच असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी- 30
महायुती- 17
अपक्ष- 1
महायुतीमधील पक्षीय बलाबल
भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8