Thackeray vs Shinde : धनुष्यबाणासाठी निवडणूक आयोगात सामना, ठाकरे गट दुपारी 1 वाजता उत्तर दाखल करणार
Thackeray vs Shinde : शिवसेनेतील फुटीनंतर धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावर निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या लढाईत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. ठाकरे गट (Thackeray Group) आज दुपारी एक वाजता आपलं प्राथमिक उत्तर निवडणूक आयोगात दाखल करणार आहे.
Thackeray vs Shinde : दसरा मेळाव्याची लढाई संपल्यानंतर आता शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे आणि शिंदे गटातली (Shinde Group) पुढची लढाई पक्षाच्या चिन्हाबाबत असणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावर निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या लढाईत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना आज आपली बाजू निवडणूक आयोगात मांडायची आहे. ठाकरे गट (Thackeray Group) आज दुपारी एक वाजता आपलं प्राथमिक उत्तर निवडणूक आयोगात दाखल करणार आहे. त्यासाठी खासदार अनिल देसाई आणि वकिलांची टीम दिल्लीत दाखल झाली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 14 ऑक्टोबर ही आहे. त्याआधी चिन्हाचं काय होणार याकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून चिन्हाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाचा निकाल तात्काळ लावा अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला केली आहे. यासंदर्भात शिंदे गटाकडून 4 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आलं आहे.
शिवसेनेतल्या दोन गटांसाठी निवडणूक आयोगात आजचा दिवस का महत्त्वाचा आहे आणि त्यांच्याकडून नेमकं काय अपेक्षित आहे, ते पाहूया...
- पक्षामध्ये उभी फूट झाली आहे की नाही हे ठरवून निवडणूक आयोगाला निकाल द्यायचा आहे
- पक्षाच्या वेगवेगळ्या स्तरांवर, कार्यकारणीत किती लोक आपल्या बाजूने आहेत याचे आकडे द्यावे लागणार
- सोबत त्यांची शपथपत्रे निवडणूक आयोगाला दिली जाणार
- विधीमंडळ पक्षासोबतच पक्षाच्या इतर शाखा आहेत याची माहिती आयोगाला द्यावी लागणार
- शाखामधलं देखील संख्याबळ असंच शपथपत्राद्वारे सादर केलं जाऊ शकतं
- आज दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे
- अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमुळे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोग गोठवण्याची शक्यता
धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास दोन्ही गटांची चिन्हे कोणती?
शिवसेनेतल्या सत्तासंघर्षात निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला, तर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटांना कोणतं चिन्ह मिळेल याविषयी राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा सुरु झाली आहे. दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यांवर नीट नजर टाकली तर शिंदे गटाचा कल तलवारीकडे आणि ठाकरे गटाचा कल गदा या चिन्हाकडे आहे का अशी चर्चा सुरु आहे. त्याचं कारण दसरा मेळाव्यात शिंदे गटाकडून तलवार आणि ठाकरे गटाकडून गदा या शस्त्रांचा झालेला वापर आणि उल्लेख हे आहे. शिंदे गटाच्या मेळाव्यात 52 फुटी तलवार व्यासपीठासमोर ठेवण्यात आली होती. तसंच व्यासपीठावरही एक भव्य तलवार आणण्यात आली होती. त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरुन गदेचा वारंवार उल्लेख केला. त्यांना एक गदा भेट म्हणूनही देण्यात आली. त्यामुळे धनुष्यबाणाचं चिन्ह गोठवण्यात आल्यास शिंदे गटाकडून तलवार आणि ठाकरे गटाकडून गदेच्या पर्यायाला पसंती दिली जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
Shivsena : ठाकरे गटाकडून चिन्हाचा गैरवापर, निकाल तात्काळ लावा; शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी