(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Thackeray vs Shinde : मातोश्रीचा 'हिसाब' चुकता करणार? फ्रिजच्या खोक्याचं गूढ उकलणार?
Thackeray vs Shinde : बुलढाण्यातल्या सभेत उद्धव ठाकरे शिंदे सरकारविरोधात खोके, बोके, रेडे आणि बरंच काही बोलले. त्यानंतर शिंदे सरकारने आक्रमक पवित्रा घेत ठाकरेंचा फ्रिजचाच खोका बाहेर काढला. आता हे प्रकरण आणखी पुढे जाण्याची शक्यता आहे
Thackeray vs Shinde : मातोश्रीतल्या फ्रिजचे खोके, मातोश्रीच्या कंपन्या, मोताश्रीचे व्यवहार आणि मातोश्रीची संपत्ती आता सगळंच काही बाहेर येण्याची शक्यता आहे. बुलढाणातल्या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारवर टीका केल्यानंतर शिंदे सरकार अधिक आक्रमक झालं आहे. वारंवार होणाऱ्या गद्दार आणि खोक्याचा ठाकरे ॲन्ड कंपनीचा जशास तसा हिसाब चुकता केला जाणार आहे. उद्धव ठाकरे ज्या भाषेत शिंदे सरकारवर टीका करत आहेत आता त्याच भाषेत त्यांना उत्तरं देण्याची तयारीत शिंदे गट आहे. त्यामुळेच दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या फ्रिजच्या खोक्याचा धागा पकडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) देखील हे प्रकरण पुढे वाढलं जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.
'50 खोके, एकदम ओके' ही घोषणा मागच्या अधिवेशनात चांगलीच गाजली. पण आता फ्रीजच्या खोक्याने एन्ट्री घेतल्याने सगळीच गणित बदलली जाण्याची शक्यता आहे. मातोश्रीवर फ्रिजच्या खोक्यांचा उल्लेख दीपक केसरकर यांनी केला. आता हे खोके नेमके कसे आणि कधी गेले हे लवकरच बाहेर काढण्याची तयारी सुरु झाली आहे.
याआधी देखील उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांच्या उत्पन्नाच्या साधानावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना आदित्य ठाकरे या तर उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषेदवर जाताना प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती पहिल्यांदाच जाहीर केली होती
आदित्य ठाकरेंच्या प्रतिज्ञापत्रात -
- एकूण संपत्ती 11 कोटी 38 लाख असल्याचे नमूद केलं आहे
- यापैकी बँकेमध्ये 10 कोटी 36 लाख रुपये आहेत.
- त्याचबरोबर बॉण्ड शेअर्समध्ये 20 लाख 39 हजारांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
- याव्यतिरिक्त 4 कोटी 67 लाखांची स्थावर मालमत्ता आदित्य यांच्या मालकीची आहे.
- वाहन - BMW कार MH02Cb1234 किंमत - 6 लाख 50 हजार दाखवण्यात आलं आहे
- तर दागिने 64 लाख 65 हजारांचे आहेत
- इतर - 10 लाख 22 हजार
- ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीची संपत्ती प्रथमच आदित्य यांच्या उमेदवारीमुळे जाहीर झाली आहे.
उद्धव ठाकरेंच्या प्रतिज्ञापत्रात -
- उद्धव यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचं असं एकही वाहन नाही.
- त्यांच्या मालकीचे मुंबईत दोन बंगले आहेत.
- वांद्रे कलानगर येथील मातोश्री बंगला तसेच तिथून जवळच साकारलेला नवा बंगला आणि कर्जत येथील फार्महाऊस याचा तपशील त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिला आहे.
- विविध कंपन्यांचे शेअर्स, कंपन्यांमधील भागीदारी आणि त्यांचे डिव्हिडंड हे उत्पन्नाचे स्रोत असल्याची नोंदही यात आहे.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चल आणि अचल अशी जवळपास 125 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रात सध्या ठाकरे आणि शिंदे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. 50 खोक्यांवरुन शिंदे आणि त्याच्या आमदार खासदारांना चिडवलं जातं पण त्यातले काहीच पुरावे अद्याप समोर आले नाहीत तर दुसरीकडे दीपक केसरकार यांनी फ्रिजच्या खोक्यांबद्दलचा आरोप हवेतच केला आहे की त्याची काही पुरावे समोर आणले जाणार आहेत ? फ्रिजचा खोका कुठे दिला? फ्रिजच्या खोक्यात नेमकं काय होतं? फ्रिजचा खोका देणारे कोण होते? असे अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर पडले आहेत त्यांची उत्तर शिंदे सरकार देणार आहेत का? का फक्त एकमेकांना ब्लॅकमेल करण्यासाठी दोघेही राजकारणाच्या पटलावर फासे तर टाकत नाहीय ना? असाही प्रश्न विचारला जात आहे.