Video : दादांना सांगा ताई आली, वहिनींनी सांगा ताई आली, पुण्यात घोषणाबाजी, सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत!
राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात ताई विरुद्ध वहिनी असा सामना रंगला होता. त्यामुळे, सुळे विरुद्ध पवार असा घरगुती सामना बारामती मतदारसंघात रंगल्याने देशाचे लक्ष लागले होते
पुणे : बारामती लोकसभ मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी 1 लाख 53 हजार 960 मताधिक्य घेऊन दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे बारामती लोकसभा (Baramati loksabha) मतदारांत मोठ्या साहेबांचा आजही दबदबा असल्याचे दिसून आले. त्यामुळे, खासदार सुप्रिया सुळेंचं आता गावोगावी जल्लोषात स्वागत होत आहे. निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पुण्यात आल्यानंतर सुप्रिया सुळे (Supriya sule) यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे (Pune) पालकमंत्री अजित पवार यांना उद्देशून घोषणाबाजीही करण्यात आली. दादांना सांगा ताई आली... असे म्हणत पुण्यातील सुप्रिया सुळे समर्थकांनी मोठा जल्लोष केला. सुप्रिया सुळेंना विजयाच्या गुलालाने रंगवण्यात आलं होतं. यावेळी, सुप्रिया सुळे यांच्यासह समर्थकांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद स्पष्टपणे झळकत असल्याचे दिसून आले.
राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात ताई विरुद्ध वहिनी असा सामना रंगला होता. त्यामुळे, सुळे विरुद्ध पवार असा घरगुती सामना बारामती लोकसभा मतदारसंघात रंगल्याने देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते. तर, राज्यातील हायव्होल्टेज लढत म्हणूनही इकडे पाहण्यात आले. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच अप्रत्यक्षपणे ही लढत झाली. मात्र, या लढतीत बारामतीकरांनी मोठ्या साहेबांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळेच, सुप्रिया सुळेंचं पुण्यात स्वागत करताना घोषणाबाजी करण्यात आली. दादांना सांगा ताई आली, वहिनींनी सांगा ताई आली, अशी घोषणाबाजी ताईसमर्थकांनी केली. दरम्यान, सुप्रिया सुळे यांना बारामतीमध्ये 1 लाख 53 हजार 960 मताधिक्याने विजय मिळाला.
खासदार बनल्यानंतर आज सुप्रिया सुळेंचं पुण्यात जल्लोष स्वागत करण्यात आलं. सुप्रिया सुळेंवर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण आणि गुलाल उधळून आनंद साजरा करण्यात आला. बारामती हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ असून पुणे शहरातील खडकवासला मतदारसंघातही बारामती लोकसभा मतदारसंघात जोडलेला आहे. त्यातच, गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहरात व जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांचा दबदबा आहे. मात्र, यंदा प्रथमच पुण्यातही पवार विरुद्ध पवार असे दोन गट पडले होते. त्यातूनच, सुनेत्रा पवार यांच्यासाठी आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी पळणारा कार्यकर्ता विभागला गेला होता. आता, लोकसभा निकालात सुप्रिया सुळेंनी बाजी मारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे.
#WATCH | Pune, Maharashtra: NSP-SCP MP from Baramati Supriya Sule says, "...We are always hopeful (of forming the government) and the numbers are very encouraging..." pic.twitter.com/bZHUj00BZn
— ANI (@ANI) June 6, 2024
खडकवासला मतदारसंघातून सुनेत्रा पवारांना लीड
बारामतीमध्ये एकूण 59.50 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बारामतीच्या मतदानात काहीशी घट झाली आहे. 2019 मध्ये बारामतीत 61.70 टक्के मतदान झाले होते. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढत ही अटीतटीची आहे. त्यामुळे मतदानातील ही साधारण 2 टक्क्यांची घटही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभेत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामधील मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास खडकवासला आणि पुरंदरमध्ये मतदानाची सर्वाधिक कमी टक्केवारी नोंदवली गेली आहे. खडकवासला मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असल्याने या भागातून सुनेत्रा पवार यांना मोठी लीड मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, खडकवासला मतदारसंघात अवघे 51.55 टक्के मतदान झाले. तरीही, या मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना आघाडी घेता आली नाही. येथे सुनेत्रा पवारांना 21 हजारांचं मताधिक्य आहे.