मंत्री झाल्यानंतर तानाजी सावंत यांचा पहिल्यांदाच सोलापूर दौरा, नातेपुते, मोहोळ या ठिकाणी सावंतांना विरोध
Health Minister Tanaji Sawant: आरोग्यमंत्री झाल्यानंतर तानाजी सावंत यांनी पहिल्यांदाच सोलापूर दौरा केला. सोलापूर शहरात आल्यानंतर सावंत यांनी गणेशोत्सव मंडळाना भेटी दिल्या.
Health Minister Tanaji Sawant: आरोग्यमंत्री झाल्यानंतर तानाजी सावंत यांनी पहिल्यांदाच सोलापूर दौरा केला. सोलापूर शहरात आल्यानंतर सावंत यांनी गणेशोत्सव मंडळाना भेटी दिल्या. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी लेझीम खेळण्याचा आनंद घेतला. शहरातील थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेत आरती सावंत यांनी केली. त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात लेझीम खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी शिंदे गटाने नूतन जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, मनीष काळजे, शहरप्रमुख मनोज शेजवाल यांनी देखील लेझिम मध्ये सहभाग नोंदवला.
आरोग्य मंत्री झाल्यानंतर तानाजी सावंत हे पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर होते. एकीकडे शिंदे समर्थक गटाने तानाजी सावंत यांचे जोरदार स्वागत केले. तर काही ठिकाणी तानाजी सावंत यांना विरोध झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळालं. नातेपुते या ठिकाणी ठाणे साहेबांच्या रस्त्यावरून गेले तिथे गोमूत्र शिंपडून रास्ता साफ करत युवा सेनेने आपला निषेध नोंदवला. तर मोहोळ मध्ये देखील तानाजी सावंत शहरात येण्यापूर्वीच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सोलापूर शहरात मात्र तानाजी सावंत यांची जंगी स्वागत करण्यात आले. शहरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौकात क्रेनद्वारे हार घालून तानाजी सावंत यांचे स्वागत करण्यात आले.
सोलापुरातल्या हेरिटेज लॉन याठिकाणी तानाजी सावंत या उपस्थितीत काही पक्ष प्रवेश देखील करण्यात आले. माजी नगरसेवक महादेव बिद्री, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष विशाल कल्याणी, आशिष परदेशी, प्रविण बिराजदार, मोहसीन जमादार आदी विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी तानाजी सावंत यांनी विरोधकांना टोले लगावले.
मागच्या अडीच वर्षात राज्याचे जे नुकसान झाले आहे ते भरून काढायचे आहेत. असे म्हणत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. तसेच शिंदे गट वगैरे काहीही अस्तित्वात नाही. खरी शिवसेना आमचीच आहे. एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी आहे. बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. तसेच पक्षात इनकमिंग 17 सप्टेंबर नंतर सोलापूरकरांना दिसेल. ही फक्त सुरुवात आहे. आगामी काळात सोलापूर महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत इनकमिंग होणार आहे. असे देखील मत सावंत यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. दरम्यान तानाजी सावंत यांना सोलापुरात पोहोचायला उशीर झाल्याने प्रशासकीय अधिकारी मात्र त्यांची वाट बघत रात्री उशिरापर्यंत शासकीय विश्रामगृह येथे ताटकळत उभे होते.