मिटकरींच्या वक्तव्याबाबत पंधरा दिवसात उचित कारवाई करा, राष्ट्रीय महिला आयोगाचे पोलिसांना निर्देश
Amol Mitkari: भिवंडीतल्या भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्या नीता वैभव भोईर यांनी राष्ट्रीय महिला आयोगात मिटकरींच्या विरोधात तक्रार नोंदवली होती.
Amol Mitkari: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीच्या सभेत कन्यादानाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत पंधरा दिवसात योग्य ती कारवाई करून त्याबाबत आम्हाला माहिती द्या, असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत. सांगलीतील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कन्यादानाविषयी वक्तव्य केले होते. कन्यादानाच्या वेळी मम भार्या समर्पयामि म्हणत भटजी माझी बायको तुला दिली, असं म्हणतात, असे विधान मिटकरीनी केले होते.
भिवंडीतल्या भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्या नीता वैभव भोईर यांनी राष्ट्रीय महिला आयोगात मिटकरींच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. प्रत्यक्षात असा कोणताही संदर्भ नाही व अमोल मिटकरींनी केलेलं वक्तव्य हे हिंदूधर्मातील समस्त महिला वर्गाचा अपमान करणारं आणि खिल्ली उडवणारं आहे. तेव्हा याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी नीता भोईर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली होती. महिला आयोगाने भोईर यांच्या तक्रारीची दखल घेतली असून राज्य पोलीस महासंचालकांना याविषयी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय मिटकरी भाषण करत असताना व्यासपीठावर बसलेले मंत्री जयंत पाटील आणि धनंजय मुंडे हे हसून त्यांच्या वक्तव्याला दुजोरा देत होते, हे सुद्धा तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
अमोल मिटकरींचं वक्तव्य हिंदूंच्या आणि महिलावर्गाच्या भावना दुखावणारे असून त्यांच्यावर IPC च्या कलम 354 & 509 अंतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी नीता भोईर यांनी केली होती. आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या निर्देशांनंतर पोलीस महासंचालक याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजप नेते सुनील देवधर यांनी याप्रकरणी ट्वीट करत राष्ट्रीय महिला आयोगाचे आभार मानले आहेत. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, ''कन्यादानाविषयीच्या विकृत वक्तव्याची दखल घेऊन पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश दिल्याबदद्ल राष्ट्रीय महिला आयोगाचे आभार. उद्धव ठाकरेंना समस्त हिंदू विवाहित महिलांच्या सन्मानाचे गांभीर्य व पोलिसांना कणा असेल तर त्यांनी आता मिटकरींविरोधात कठोर कारवाई करावी.''
कन्यादानाविषयीच्या विकृत वक्तव्याची दखल घेऊन पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश दिल्याबदद्ल राष्ट्रीय महिला आयोगाचे आभार.
— Sunil Deodhar (@Sunil_Deodhar) May 11, 2022
उद्धव ठाकरेंना समस्त हिंदू विवाहित महिलांच्या सन्मानाचे गांभीर्य व पोलिसांना कणा असेल तर त्यांनी आता मिटकरींविरोधात कठोर कारवाई करावी.@sharmarekha @NCWIndia https://t.co/jrvFAVtBwf