शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादिवशीच खदखद व्यक्त करत माजी मंत्र्याचा राजीनामा
Suresh Navale Resigns Shiv Sena : मुख्यमंत्री भाजपच्या दबावाखाली असल्याचं सांगत शिंदेंसोबत आलेल्यांना लोकसभेचं तिकीट मिळायला हवं होतं, पण भाजपमुळे ते मिळू शकलं नसल्याचा आरोप सुरेश नवले यांनी केला.
छ. संभाजीनगर : एकनाथ शिंदेच्या शिवसेनाला मोठा धक्का बसला असून मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यादिवशीच शिवसेनेच्या माजी मंत्र्याने राजीनामा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना नेते माजी मंत्री प्रा. सुरेश नवले (Suresh Navale ) यांनी प्रातिनिधिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या दबावाखाली असल्याचा आरोप नवले यांनी केला. शिंदेंसोबत आलेल्यांना लोकसभेचं तिकीट मिळायला हवं होतं, पण भाजपमुळे तसं झालं नाही असंही ते म्हणाले.
सोबत आलेल्यांना तिकीट मिळालं नाही हे दुर्दैव
प्रा. सुरेश नवले म्हणाले की, गेल्या दीड-दोन महिन्यांपासून शिवसैनिक, शिवसेना नेते, उपनेते यांच्या मनातील भावना मी व्यक्त केलेल्या आहेत. ज्यांनी सर्वस्व पणाला लावून मुख्यमंत्र्याची सोबत देऊन त्यांचे नेतृत्व मान्य केलं त्यांना उमेदवारी मिळत नसेल तर हे दुर्दैव आहे. एका अर्थाने त्यांचे हे राजकीय बळी देण्याचं काम सुरू आहे. हे मी लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न बहुदा पक्षातील नेतृत्वाला आवडलेला नसावा.
मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षाचा दबाव झुगारून जे सोबत आले, त्यांना तिकीट देणे अपेक्षित होतं, उमेदवारी देणं अपेक्षित होतं. कृपाल तुमानी हेमंत पाटील, भावना गवळी यांचा बळी गेला. कदाचित हेमंत गोडसे यांचा देखील बळी जाण्याची शक्यता आहे. हे चित्र कशाचं प्रतिक आहे? असा सवाल नवले यांनी विचारला.
शिवसेनेमुळे भाजप सत्तेची फळं चाखतोय
प्रा. सुरेश नवले म्हणाले की, जे शिवसैनिक तुमच्या सोबत आले, ते मित्र पक्षाच्या दबावामुळे आले, तुम्ही त्यांना न्याय देत नाहीत असा महाराष्ट्रात चुकीचा संदेश जातोय. शिवसेनेच्या खांद्यावर बसून भाजप सत्तेची फळ चाखत आहे. शिंदेनी उठाव केला म्हणून सत्तेच्या पालखीत भाजपला बसता आलं. नाही तर भाजपला रस्त्यावरती मोर्चे काढावे लागले असते, उपोषण करावा लागलं असतं.
मुख्यमंत्री मित्र पक्षाच्या दबावाला बळी पडत आहेत असा दावा करत सुरेश नवले म्हणाले की, नाशिकची उमेदवारी या क्षणापर्यंत का जाहीर झाली नाही? हेमंत गोडसेंना पाच वेळेस शक्तिप्रदर्शन करावे लागले हे कशाचं प्रतीक आहे? जे तुमच्या सोबत आले त्यांना एक क्षणाचा विलंब न करता त्यांना उमेदवारी मिळायला हवी होती. अनेकांच्या मनात अशीच खदखद, अनेक शिवसेना नेते, उपनेत्यांना हे आवडत नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिवसैनिक आणि जनता याचे उत्तर देईल.
शिंदे लाभधारकांच्या गराड्यात अडकलेत
मुख्यमंत्री फक्त लाभधारकांच्या गराड्यात अडकलेत असा आरोप करत नवले म्हणाले की, "आढळराव पाटलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, राष्ट्रवादीसाठी त्यांना तिकडून उमेदवारी मिळवावी लागली हे किती वाईट चित्र महाराष्ट्रात जात आहे. भाजप मुख्यमंत्र्याचा हक्क हिरावून घेत आहे. मुख्यमंत्री आता फक्त लाभधारकांच्या गराड्यातमध्ये दिसत आहेत. त्यांच्याभोवती सर्व लाभधारकांचा गराडा असतो. पण त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.
मी प्रभू रामचंद्राला साकडं घालतो, मित्रपक्षापासून मुख्यमंत्र्यांचे संरक्षण झालं पाहिजे, तरच शिवसेनेला भवितव्य आहे. जर मित्र पक्षाच्या दबावाखाली शिवसेना अशीच वागत राहिली तर प्रभुरामचंद्र या पक्षाला वाचवो असंही नवले म्हणाले.