अजित पवारांच्या घोषणेनंतर भाजपचा मोठा निर्णय, बारामतीतून सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी ताकद लावणार!
Baramati Lok Sabha seat : बारामतीची जागा भाजपकडून अजित पवार गटाला सोडण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar Baramati) जर बारामतीतून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या, तर त्यांना निवडून आणण्यासाठी भाजप मदत करणार आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Lok Sabha) यांनी लोकसभेच्या चार जागांची घोषणा केल्यानंतर, आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. बारामती, सातारा, शिरुर आणि रायगड या लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) चार जागा लढवण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. त्यानंतर आता भाजपने (BJP Baramati mission) मोठा निर्णय घेतला आहे. बारामतीची जागा भाजपकडून अजित पवार गटाला सोडण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar Baramati) जर बारामतीतून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या, तर त्यांना निवडून आणण्यासाठी भाजप मदत करणार आहे.
लवकरच आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागाबाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. महायुतीत शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजप हे एकत्र असल्याने महायुतीतील घटक पक्षाच्याही जागा जिंकून आणण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे.
बारामतीत सुनेत्रा पवार वि. सुप्रिया सुळे? (Sunetra Pawar vs Supriya Sule)
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात ज्या चार जागांची घोषणा केली, त्यामध्ये बारामतीचा आवर्जून उल्लेख केला. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे खासदार आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार गट उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. मात्र अजित पवार गट कोण उमेदवार देणार याची उत्सुकता अधिक आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामतीतून लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे जर अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली, तर इथे नणंद भावजंय यांच्यात लढत होईल.
भाजपचं मिशन बारामती (BJP Mission Baramati)
दरम्यान, भाजपने मिशन बारामती हाती घेतलं आणि एकच चर्चा रंगू लागली की सुप्रिया सुळे यांच्याविरोधातला उमेदवार कोण? गेल्या अनेक दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेचा दुसरा टप्पा म्हणजे पुण्यात सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेले शुभेच्छांचे बॅनर. पुण्यातील वारजे भागात हे बॅनर लागले आणि पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची चर्चा रंगू लागली.
पवार आणि बारामतीचं समीकरण (Pawar and Baramati)
पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार अस समीकरण हे अनेक दशके राज्याच्या राजकारणात रुजले आहे. सुनेत्रा पवार राज्यातील पावरफुल घराण्यातील पावरफुल सूनबाई. सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यास भाजपाने पवार घरातील कुणालातरी उमेदवारी द्यायचे असे ठरवले असल्याची चर्चा झाली होती. त्याला अजित पवारांनी पूर्ण विराम देखील दिला होता.
पण सुनेत्रा पवारांच्या वाढदिवसानिमित्त लागलेला बॅनर मधून पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांचे उमेदवारीची चर्चा रंगू लागली . पुण्यातील वारजे भागात सुनेत्रा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संसदेचे चित्र असलेला बॅनर लागला आणि पुन्हा एकदा सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
कसा आहे बारामती लोकसभा मतदारसंघ? (Baramati Lok Sabha)
- बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात.
- बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर हवेली, खडकवासला, भोर- वेल्हा हे विधानसभा मतदारसंघ येतात.
- खडकवासला आणि दौंड मतदारसंघात भाजपचा आमदार आहे.
- यामध्ये राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचे दोन, आणि भाजपचे दोन असे आमदार आहेत.
- राष्ट्रवादीचं अजित पवार आणि दत्तात्रय भरणे , काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि संजय जगताप भाजपचे राहुल कुल आणि भीमराव तापकीर असे आमदार आहेत
- अजित पवारांच्या बंडामुळे दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या बाजूला आहेत
- भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि शरद पवारांचे संबंध सलोख्याचे नाहीत
- पुरंदरचे आमदार संजय जगताप हे अजित पवारांमुळे निवडून आले आहेत. पण पुरंदर तालुक्यातील काही जण सोडले तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या बाजूला आहे
- भाजपचे राहुल कुल आणि भीमराव तापकीर
- राहुल कुल यांच्या पत्नी 2019 साली कांचन कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या
- कांचन कुल यांचा 1 लाख 30 हजार मतांनी पराभव झाला होता.
- तर 2014 साली महादेव जानकर हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते
- त्यामध्ये जानकर यांचा 69 हजार 666 मताने पराभव झाला होता
- आता सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
पवार विरूद्ध पवार अशी लढत होणार का?
बारामती लोकसभा मतदारसंघावरती गेल्या अनेक दशकात शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्याने वेगळे काही होणार का? पवार विरूद्ध पवार अशी लढत होणार का? याकडे सगळयांची नजर लागली आहे. अर्थात दोन्ही गटांकडून स्पष्ट संकेत देण्यात आलेले नाहीत.
कोण आहेत सुनेत्रा पवार? (Who is Sunetra Pawar)
- सुनेत्रा पवार या मूळच्या धाराशिवचे पॉवरफुल नेते आणि माजी खासदार आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी
- अजित पवारांशी विवाह झाल्यानंतर सुनेत्रा पवार राजकारणात सक्रिय झाल्या पण थेट राजकणात त्यांनी कधीही प्रवेश केला नाही
- एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, हायटेक टेक्स्टाईल पार्क कापड उद्योगांशी अनेक संस्था जोडल्या त्यामुळे अनेक कुटुंबातील महिलांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळाला, ग्राम स्वच्छता, स्मार्ट व्हिलेज, पर्यावरण संतुलित गाव या माध्यमातून सक्रिय आहेत.
- शिक्षण क्षेत्रात सक्रीय आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठात सिनेट सदस्य
- अजित पवारांनंतर मुलगा पार्थ आणि जय या दोघांनाही राजकारणात आणण्यासाठी त्या सक्रिय झाल्या
- राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोण निवडणूक लढणार असा प्रश्न उपस्थित झाला आणि सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे आले.
पक्षात फूट, पण कुटुंबात एकी दाखवण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादीत जरी फूट पडली असती तरी पवार कुटुंब एक आहे हे दाखवण्याचा दोन्ही गटांकडून सतत प्रयत्न कऱण्यात आला आहे. मग अजित पवारांच्या वडिलांच्या नावाने उभी असलेल्या शाळेचा कार्यक्रम असो वा बारामतीतील विविध कार्यक्रम असो किंवा दिवाळीतील एकत्र दिसलेलं पवार कुटुंब असो. मात्र येणाऱ्या निवडणुकीत पवार कुटुंब फुटणार का हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. सुनेत्रा पवार राजकारणात उतरतात का हे महत्त्वाचे असणार आहे.
संबंधित बातम्या
Special Report Pawar Vs Pawar : बारामतीत पवार कुटुंब आमनेसामने ? पवार विरुद्ध पवार
Special Report Ajit Pawar Vs Sharad Pawar : अजित पवारांनी मांडली 3 तारखा आणि क्रोनोलॉजी ABP Majha