Sudhakar Badgujar: सुधाकर बडगुजरांच्या एन्ट्रीने भाजपमधील संघर्ष उफाळला, नाशिकच्या राजकारणातही उलथापालथ
Sudhakar Badgujar joins BJP: सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप मुख्यालयात पक्षप्रवेश करत कमळ हाती धरले. यामुळे नाशिकच्या राजकारणात बदल पाहायला मिळतील.

Sudhakar Badgujar Nashik: शिवसेना उबाठा गटातून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, या प्रवेशामुळे भाजपमधील कुरघोडीचे राजकारण, विसंवाद, सावळागोंधळ समोर आला आहे. शेकडो कार्यकर्त्यांसह बडगुजर प्रवेश करत असताना प्रदेशाध्यक्षांना याबाबतीत कल्पनाच नसल्याचे त्यांनी सांगितल्याने गोंधळात आणखीन भर पडली.
नाशिकमधून हातात भाजपचे झेंडे घेऊन वाहनांचा ताफा आज भाजप प्रवेशासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाला. प्रमुख प्रवेशकर्ते होते शिवसेना उबाठा गटातुन हकालपट्टी झालले सुधाकर बडगुजर. सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमधे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्याच दिवसापासून त्यांच्या भजाप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्यात आणि त्यांच्या प्रवेशाला स्थानिक पातळीवर विरोध ही सुरू झाला. यात सर्वात पुढे नाव होते नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांचे. विधानसभा निवडणुकीत दोन वेळा सीमा हिरे आणि बडगुजर आमनेसामने होते. एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असल्याने सीमा हिरेंनी विरोधाची तलवार उपसली आणि त्यांना इतर पदाधिकाऱ्यांनी साथ दिली. मात्र, दुसऱ्याच दिवशी नाशिकमधे आलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन यांनी स्थानिकांचा आवाज दाबत पक्ष वाढीसाठी कोणी येत असेल तर पक्षाचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचे सांगितले. त्यामुळे बडगुजर यांच्यासाठी भाजपमध्ये रेड कार्पेट टाकण्यात आल्याचे बोलले जाते होते.
मात्र, आज बडगुजर शेकडो समर्थकांसह भाजप प्रवेशासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले असताना बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत कल्पना नसल्याचे सांगत बावनकुळे यांनी मोठा बॉम्ब टाकला आणि त्यानंतर सर्वच संभ्रमात पडले. काही महिन्यांपूर्वी संजय राऊत यांनी बावनकुळे यांचे मकाऊच्या कॅसिनोमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. राऊत यांच्या आरोपांचे बावनकुळे यांनी त्याचवेळी खंडन करत फोटोचा वापर करून संभ्रम निर्माण केला जात असल्याचा प्रतिहल्ला केला होता. सुधाकर बडगुजर यांच्याच माध्यमातून फोटो राऊत यांच्यापर्यंत पोहचल्याचे बोलले जाते. त्यामुळे आजच्या सगळ्या गोंधळाला वादाची किनार आहे का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
Nashik News: नाशिकमध्ये गिरीश महाजनांचा वचक, स्थानिक नेते नाईलाजाने गप्प
बावनकुळे यांच्या वक्तव्याने पक्षातील विसंवाद, समोर असून भाजप मधील दोन मोठ्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरु आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. नाशिकच्या भाजपवर मंत्री गिरीश महाजन यांचा कंट्रोल आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्यां पुढाकाराने बडगुजर यांचा प्रवेश होतोय. नाशिक महापालिका निवडणुकीची सर्व जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर असणार आहे. त्यामुळे त्यांना जे हवे त्यांना प्रवेश दिला जात असल्याची पक्षात चर्चा आहे. मात्र, आता स्थानिक पातळीवर कोणी समोर येऊन बोलण्याची हिम्मत कोणी करत नाही. बावनकुळे यांच्या पाठोपाठ कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत फारशी प्रतिक्रिया दिली नाही. मात्र सलीम कुत्ता प्रकरणी आरोपाची राळ उठविणाऱ्या मंत्री नितेश राणे यांची बडगुजर यांच्याबाबतची भूमिका बदलली आहे.
अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर बडगुजर यांचा भाजप प्रवेश झाला आहे. हा प्रवेश सोहळा काही क्षणांचा असला तरी ज्यांनी आज बडगुजर यांना विरोध केलाय, वरिष्ठांच्या दबावामुळे जे बोलत नाहीये, त्यांना सोबत काम घेऊनच बडगुजर यांना पुढील वाटचाल करावी लागणार आहे. त्यामुळे बडगुजर यांचा खरा कसोटीचा काळ आजपासून सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आणखी वाचा























