(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दक्षिण मुंबई विजयासाठी यामिनी जाधवांची 'मनसे' साद; राज ठाकरेंसोबत 'शिवतीर्था'वर खलबतं
Yamini Jadhav Meets Raj Thackeray : दक्षिण मुंबईत राज ठाकरेंची मोठी ताकद आहे. तसेच, लोकसभा निवडणूकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठींबा दिला आहे. त्यामुळे ही भेट महत्वाची मानली जात आहे.
South Mumbai Lok Sabha Election 2024 : मुंबई : दक्षिण मुंबईच्या उमेदवार (South Mumbai Lok Sabha Candidate) यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. दक्षिण मुंबईत राज ठाकरेंची मोठी ताकद आहे. त्यामुळे ही भेट महत्वाची मानली जात आहे. दरम्यान, या भेटीवेळी मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar), शिवसेना उपनेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) देखील उपस्थित होते.
लोकसभा निवडणूकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठींबा दिला आहे. दक्षिण मुंबईत मनसेची मोठी ताकद असून राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी राज ठाकरेंची घेतलेली ही भेट महत्वाची मानली जात आहे.
ठाकरेंची सहानुभूती मोडीत काढण्यासाठी, यामिनी जाधव 'राज'मार्गाचा आधार घेणार?
दक्षिण मुंबई मतदारसंघात मराठी मतदार अधिक आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेनं मोठा विजय मिळवला होता. दोन्ही वेळा शिवसेनेचे अरविंद सावंत मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले होते. अशातच दक्षिण मुंबईतील ठाकरेंची लाट मोडीत काढण्यासाठी महायुतीकडून अनेक नावांची चाचपणी सुरू होती. ठाकरेंची सहानुभूती मोडीत काढण्यासाठी महायुतीनं दुसऱ्या ठाकरेंना मैदानात उतरवण्याचा घाट घातल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू होत्या. मात्र, मनसेच्या गुडीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. असं असलं तरीदेखील राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठींबा दिला आहे. तसेच, दक्षिण मुंबई मतदारसंघात मनसेची मोठी ताकद आहे. याच पार्श्वभूमीवर यामिनी जाधव यांनी घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.
महायुतीकडून यामिनी जाधव लोकसभेच्या रिंगणात
शिवसेनेत उभी फुट पडली आणि राज्याच्या राजकारणात मोठा भूंकप आला. यंदाची निवडणूक याच फुटीमुळे फार वेगळी आणि चुरशीची होणार आहे. शिवसेनेतील फुटीमुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील सर्वच समीकरणं पुरती बदलली आहेत. अशातच ठाकरेंचा बालेकिल्ला आणि मराठीबहुल असलेल्या दक्षिण मुंबईतून दोन शिवसैनिक एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. महाविकास आघाडीकडून दक्षिण मुंबईची जागा ठाकरेंना सुटली असून ठाकरेंनी अरविंद सावंत यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, महायुतीकडून दक्षिण मुंबईच्या जागेसाठी बरीच खलबतं करण्यात आली. अनेकांच्या नावाची चाचपणी केल्यानंतर अखेर ही जागा शिंदे गटाला सुटली आणि शिवसेनेकडून आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे दक्षिण मुंबईतून दोन शिवसैनिकांमध्ये कडवी झुंज होणार आहे.