...तर मी राजकारणातून संन्यास घेतो, नाहीतर तुम्ही घ्या; विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा, रोहित पवारांना टोला
तलाठी भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी केला होता.
अहमदनगर : राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडलेली तलाठी भरतीचा विषय आता संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे. कारण, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe patil) यांच्या हस्ते आज नवनिर्वाचित तलाठ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तलाठी भरतीवरून कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सरकारवर सातत्याने टीका केली होती. विशेष म्हणजे आमदार रोहित पवार यांनी तलाठी भरतीचा मुद्दा लावून धरला होता. मात्र, शासनाने परीक्षांचा निकाल अंतिम ठरवत मेरीट लिस्टमधील उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले आहेत.
तलाठी भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी केला होता. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले कील, जिल्ह्यातील दोन महाभागांनी याबाबत आरोप केले होते. मात्र, तलाठी भरती ही पारदर्शक पद्धतीने झाली असून आज आम्ही नवनियुक्त तलाठ्यांना नियुक्त पत्र देत आहोत. ही या दोन महाभागांना चपराक असल्याचं म्हणत विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात आणि पवार यांच्यावर निशाणा साधला. तसेच, या तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचे थोरातांनी सिद्ध करावं, त्यांनी भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध केलं तर मी राजकारणातून बाजूला जाईल आणि थोरात भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाही तर त्यांनी बाहेर जावं, असं चॅलेंजच राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरात यांना दिले.
बाळासाहेब थोरातांच्या काळात रेटकार्ड
माजी महसूलमंत्र्यांच्या काळात तर तहसीलदार, तलाठ्यांच्या बदल्या करण्यासाठी रेटकार्ड होते, असं मी ऐकलं होतं. आम्ही तलाठी भरती ही पारदर्शक पद्धतीने केले. मात्र, ज्यांच्या दिव्याखाली अंधार आहे आणि ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत, त्यांनी दुसऱ्यावर आरोप करण्यापूर्वी आपण काचेच्या घरात राहतो हे लक्षात घ्यावं, असं म्हणत विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना लक्ष्य केलं.
उद्धव ठाकर वैफल्यग्रस्त
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले. ठाकरे हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत, सरकार गेल्याचं दुःख आहे आणि परत सरकार मिळणार नाही, याचेही दुःख आहे. महाराष्ट्राचे राजकारण हे सभ्यतेच राजकारण आहे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नसल्याचे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.
पूजा खेडकर प्रकरणावरही भाष्य
अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणापत्र मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखेंना विचारले असता, हे प्रकरण मोठे आहे, याबाबत चौकशी होईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, असे विखेंनी म्हटले.