Maharashtra Voting: विदर्भातील मतदान आटोपलं, शिवसेनेच्या बुजुर्ग नेत्याने टक्केवारी पाहताच पॅटर्न हेरला, वारं फिरल्याची खूण सांगितली
Vidarbha Lok Sabha Voting: बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक राजकीय पावसाळे पाहिलेल्या शिवसेनेच्या बुजुर्ग नेत्याने विदर्भातील मतदानाचा पॅटर्न हेरला. पहिल्या टप्प्याचं मतदान संपताच सुभाष देसाई यांनी महत्त्वाचं भाकीत केलं.
मुंबई: राज्यात शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विदर्भातील मतदानाची टक्केवारी काहीप्रमाणात वाढलेली दिसत आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये सरासरी 54.85 टक्के मतदान (Maharashtra Voting) झाले होते. त्यानंतरच्या तासाभराचा अंदाज पकडता मतदानाची एकूण टक्केवारी 60 टक्क्यांच्या आसपास पोहोचल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेत वर्षानुवर्षे काम केलेल्या आणि अनेक राजकीय पावसाळे पाहिलेले बुजुर्ग नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी एक महत्त्वपूर्ण भाकीत केले. विदर्भातील मतदानाची टक्केवारी पाहता राज्यात बदल होण्याचा अंदाज सुभाष देसाई यांनी वर्तविला.
सायंकाळी 5 वाजेपर्यंत किती झाले मतदान? पाहा आकडेवारी एका क्लिकवर
सुभाष देसाई हे शुक्रवारी दक्षिण मुंबईतील ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी सुभाष देसाई यांनी म्हटले की, आज पहिल्या टप्प्यात 60 टक्के मतदान झाले आहे. इतिहास सांगतो की, जेव्हा मतदान जास्त होते, तेव्हा मतदारांना बदल हवा असतो. 25 वर्षांपासून धनुष्यबाण ही निशाणी आपल्याला तोंडपाठ आहे. त्यामुळे नवं चिन्ह सांगताना गोंधळ उडू शकतो. पण आपण सर्व मतदारांना आपलं चिन्ह ठासून सांगितलं पाहिजे. आपल्याला लोकशाही, राज्यघटना आणि देश वाचवायचा आहे, तसेच निष्ठाही वाचवायची आहे. ही गद्दारी विरुद्ध निष्ठेची निवडणूक आहे. आपल्याला सगळ्या गद्दारांना घरी बसवायचे आहे. अद्याप दक्षिण मुंबई मतदारसंघात गद्दारांकडून कोण उतरणार, हे ठरलेले नाही. मात्र, आपला खेळाडू तयार आहे, फिल्डिंग लागली आहे. पण समोरून बॉलरच येत नाही. पण आपला बॅटसमन् सिक्सर मारणार आहे, असे सुभाष देसाई यांनी म्हटले.
मिलिंद देवरा या गद्दाराला हद्दपार करायचंय: भाई जगताप
आजच्या प्रचारसभेत काँग्रेसच्या भाई जगताप यांनी शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांच्यावर टीकास्त्र सोडले. भाई जगताप यांनी देवरा यांचे नाव न घेता म्हटले की, आमच्याकडेही काही गद्दार आहेत. या गद्दाराला दक्षिण मुंबईतून पुन्हा एकदा हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. मुंबई दक्षिणमधून महायुतीकडूनकडून मिलिंद देवरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाई जगताप यांनी देवरा यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
आणखी वाचा
उद्धव ठाकरे दलित विरोधी, काँग्रेसला सांगून वर्षा गायकवाडांचं तिकीट कापलं; मिलिंद देवरांचा आरोप