Milind Deora: उद्धव ठाकरे दलित विरोधी, काँग्रेसला सांगून वर्षा गायकवाडांचं तिकीट कापलं; मिलिंद देवरांचा आरोप
Maharashtra Politics: दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी काँग्रेस पक्ष आग्रही होता. मात्र, ठाकरे गटाने या जागेवरुन अनिल देसाई यांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या जागेवरुन उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
मुंबई: काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या दलित असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मध्य मुंबईची जागा त्यांना सोडण्यास नकार दिला, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी केला. दक्षिण मध्य मुंबई हा खुल्या प्रवर्गातील मतदारसंघ आहे. त्यामुळे येथून वर्षा गायकवाडांच्या (Varsha Gaikwad) रुपाने दलित चेहरा दिल्यास नुकसान होऊ शकते, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस नेत्यांना सांगितल्याचा दावा देवरा यांनी केला. मिलिंद देवरा यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.
या ट्विटमध्ये देवरा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि उबाठा गटाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते. उबाठा गट महाराष्ट्रात २१ जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र त्यात केवळ एका जागेवर उबाठा गटाने दलित उमेदवाराला संधी दिली आहे. आम्ही या निवडणुकीत तीन दलित उमेदवारांना संधी दिली आहे. महाविकास आघाडीत दलित उमेदवारांची प्रतारणा सुरु आहे. कारण काँग्रेस आणि उबाठामध्ये दलित समाजबांधवांना स्थान आणि मान नाही आणि खुल्या मतदारसंघातून दलित उमेदवार उभा करण्याची त्यांच्यात हिंमत नाही, असे मिलिंद देवरा यांनी म्हटले.
उबाठा गटाला दलित समाजाची मतं हवीत, पण नेतृत्त्व नको: मिलिंद देवरा
निवडणुकीत दलित समाजाची मते हवीत, पण या समाजाला नेतृत्वाची संधी द्यायची नाही, अशी दुटप्पी भूमिका उबाठा गटाची दिसून येते.माझ्याकडे माहिती आहे की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला असे कळविले की वर्षा गायकवाड यांना खुल्या जागेवर (दक्षिण-मध्य मुंबई) तिकिट दिले तर दलित असल्यामुळे त्यांचा पराभव होईल. एक सुशिक्षित, सक्षम आणि राजकारणात आपल्या कामगिरीने ठसा उमटवणाऱ्या वर्षा गायकवाड यांच्याबाबत जे राजकारण होत आहे ते दुर्देवी आहे. अशा मानसिकतेचा मी निषेध करतो, असे मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि उबाठा गटाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते. उबाठा गट महाराष्ट्रात २१ जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र त्यात केवळ एका जागेवर उबाठा गटाने दलित उमेदवाराला संधी दिली आहे. आम्ही या निवडणुकीत तीन दलित उमेदवारांना…
— Milind Deora | मिलिंद देवरा (@milinddeora) April 19, 2024
राहुल शेवाळे राज ठाकरेंच्या भेटीला
शिंदे गटाचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी शुक्रवारी सकाळी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानले. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल शेवाळे यांनी म्हटले की, राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे, त्यांच्या प्रचारात सामील व्हावे. नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्यासोबत बैठक झाली आणि ते दक्षिण मध्य मुंबई लोकसभा समन्वयक आहेत. त्यांच्यासोबत चर्चा करून लोकसभा निवडणुकीसंदर्भातली रणनीती आखण्यात आली आहे, असे राहुल शेवाळे यांनी सांगितले.
आणखी वाचा
निरुपम यांच्यानंतर वर्षा गायकवाड देखील थेटच बोलल्या, उद्धव ठाकरेंच्या घोषणेनं आघाडीत बिघाडी?