Sangli Lok Sabha : सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला; मविआच्या बैठकीत घोषणा, काँग्रेसने काय म्हटले?
Sangli Lok Sabha : सांगली लोकसभेची जागा आता शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत याची घोषणा करण्यात आली.
Sangli Lok Sabha Seat : महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत तिढा असलेली सांगली लोकसभेची जागा ही अखेर अधिकृतपणे शिवसेना ठाकरे गटाला मिळाली आहे. काँग्रेसने सांगलीवर सातत्याने दावा केला होता. मात्र, आज जाहीर झालेल्या जागा वाटपात सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद (Joint Press Conference Of Maha Vikas Aghadi) असून जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, युती आघाडी मध्ये शक्य असेल तेवढी चर्चा आम्ही करत असतो . नंतर एकमेकांना समजून घेऊन निवडणुकीच्या तयारीला लागावं लागते.
जिकण्याचा उ्दिष्टे ठेवल्यानंतर एकत्रित येऊन लढावं लागते.आपण कशासाठी लढतोय हे सगळ्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे असे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाविकास आघाडीकडून लवकरच प्रचार कार्यक्रम जाहीर करू असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने काय म्हटले?
सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला होता. आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी सांगितले की, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलोय. मोठे मन करून आम्ही जागा वाटप अंतिम केला आहे. मुस्लिम लीगने या देशाला तोडलं, मुस्लिम लीगचा उल्लेख करण्याचा उद्देश काय असा सवाल त्यांनी केला. मविआ आघाडीतील घटक पक्षांमधील उमेदवारांना मते वळती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तिन्ही कार्यकर्ते एकत्रित येऊन उमेदवार निवडून आणतील असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून शिवसेना ठाकरे गट 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार आहे. कित्येक दिवसांपासूनचा महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. तर, सांगली आणि भिवंडीच्या जागांचाही तिढा सुटला आहे.
महाविकास आघाडी जागावाटपाचा फॉर्म्युला
- काँग्रेस (Congress) : 17 जागा
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) : 10 जागा
- शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Group) : 21 जागा
सविस्तर वृत्त थोड्याच वेळेत....