बहुमत असतानाही मंत्रिमंडळ स्थापन होऊ शकलं नाही हे दुर्दैव, अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल
23 तारखेला निवडणुकीचा निकाल लागून जवळपास 20 ते 22 दिवस झाले. बहुमत असताना मंत्रिमंडळ स्थापन होऊ शकलं नाही. हे दुर्दैव असल्याचे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले.
Ambadas Danve : मंत्रीमंडळ विस्ताराबाबतच्या बातम्या येत आहेत. पण मंत्रिमंडळ विस्ताराची अधिकृत कुठलीही माहिती नाही. आत्ताच प्रशासनाकडून चौकशी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथ विधीची तयारी केली असली, तरी अधिकारीकरित्या कोणालाही सांगितलेलं नसल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. कामकाजाला न्याय द्यायचा असेल तर मंत्रिमंडळ विस्तार करावा लागेल. आताच्या घडीला 23 तारखेला निकाल लागूनही जवळपास 20 ते 22 दिवस झाले. बहुमत असताना मंत्रिमंडळ स्थापन होऊ शकलं नाही. हे दुर्दैव असल्याचे दानवे म्हणाले.
तीन आठवड्याचे अधिवेशन व्हायला पाहिजे होतं
शेतकऱ्यांचे (Farmers) प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, बोगस औषधाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सरकारने निवडणुकीच्या काळात अनेक योजना लागू केल्या आहे, रेवड्या वाटण्याचं काम केलं. मात्र तिजोरीत काय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका मांडू असेही दानवे म्हणाले. खरंतर विदर्भाचे मुख्यमंत्री झाल्यावर विदर्भात तीन आठवड्याचे अधिवेशन व्हायला पाहिजे होतं, फॉर्मॅलिटी म्हणून सातत्याने अधिवेशन घेतलं जातं ही सत्यस्थिती नाकारता येत नाही. विदर्भातील अधिवेशन विदर्भातील जनतेला न्याय देण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी व्हायला पाहिजे. पण यातून उद्दिष्ट सार्थ होताना दिसून येत नाही हे दुर्दैव असल्याचे दानवे म्हणाले.
भाजप त्यांच्या मनासारखं करत आहे
कोणत्याही मंत्र्याला हेच विभाग असलं पाहिजे, तेच खातं हाती असलं पाहिजे असा आग्रह का? जनतेची सेवा करताना कुठलेही खाते असले, तरी काम करता येते. सत्तेच्या स्पर्धेमुळे मैत्री बाजूला ठेवून खाते मिळवण्यासाठी यांच्यात स्पर्धा सुरू झाली असल्याची टीका देखील दानवे यांनी केली.
एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री व्हावे, त्यासाठी त्यांना विनवण्या करावा लागल्या. खाते वाटपासाठी विनवण्या करावा लागत आहेत. भाजप त्यांच्या मनासारखं करत आहे. भाजपला जे वाटते, ते केल्याशिवाय राहणार नाही असं वाटत असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. उद्या विरोधी पक्ष नेत्यांची बैठक होईल, त्यात आम्ही सगळ्या मुद्द्यांवर स्पष्टपणे विचार करु असेही दानवे म्हणाले. दरम्यान, दादरमधील हनुमान मंदिराच्या संदर्भात देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे 80 वर्ष जुने मंदीर आहे. हिंदुत्वाचं सरकार असताना मंदिर पाडण्याचा निर्णय होत असेल तर दुर्दैव आहे. हिंदुत्ववादी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका ही मंदिर वाचवण्याची असल्याचे अंबादास दानवे म्हणाले.