शिवाजी आढळराव मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची घोषणा करणार?
Shirur Lok Sabha constituency : शिरूर लोकसभेत खासदार अमोल कोल्हे विरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणार? अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघासाठी अडून असल्यानं शिंदे गटाच्या शिवाजी आढळराव पाटलांची चांगलीच गोची झालीये.
Shirur Lok Sabha constituency : शिरूर लोकसभेत खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणार? अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघासाठी अडून असल्यानं शिंदे गटाच्या शिवाजी आढळराव पाटलांची चांगलीच गोची झालीये. अजित पवारांनी दबावतंत्र अवलंबल्यानं शिवाजी आढळरावांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागू शकतो? अन्यथा अजित पवारांनी भाजपच्या प्रदीप कंद यांना अमोल कोल्हे यांच्या विरोधात रिंगणात उतरवू, असा पत्ता खुला केलाय. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटलांच्या उपस्थित दोन दिवसांपूर्वी बैठक झालीये. स्वतः आढळराव ही मुंबईत हजर होतेच. त्यावेळी अजित पवारांनी हे दबावतंत्र अवलंबले आहे. आता अजित पवारांच्या या दबावाला आढळराव बळी पडण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने आढळरावांनी आज शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत चर्चा करू शकतात. कदाचित ते याबाबतची अप्रत्यक्षपणे घोषणा करण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.
येत्या काही तासांत आढळरावांनी तसा निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण दुसरीकडे अजित पवारांनी आढळरावांच्या बाले किल्ल्यात अर्थात मंचरमध्ये चार मार्चला जाहीर सभा घेण्याचं नियोजन आखलंय. त्या सभेत एकतर आढळरावांचा, नाहीतर प्रदीप कंद यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ शकतो. लोकसभेची आचारसंहिता 15 मार्चच्या आधी कधी ही लागू शकते. तत्पूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण? यावर शिक्कामोर्तब करणं गरजेचं आहे. सध्या शिरूर लोकसभेच्या अनुषंगाने महायुतीत घडणाऱ्या राजकीय हालचाली पाहता, या आठवड्याभरात महायुतीचा उमेदवार ठरू शकतो. याच पार्श्वभूमीवर आज आढळरावांनी बोलवलेल्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
म्हाडाचे अध्यक्षपद देऊन आढळरावांचा पत्ता कट ?
शिरूर मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे राखण्यासाठी महायुतीने चंग बांधला आहे. त्यामुळेच या मतदारसंघावर दावा करणाऱ्या शिंदे गटाच्या आढळरावांना म्हाडाचे अध्यक्षपद देऊन शांत बसवण्यात आल्याची चर्चा आहे. पुणे म्हाडाचे अध्यक्षपदे हे राज्यमंत्र्यांच्या दर्जाचे आहे. त्यामुळेच आढळरावांचा पत्ता कट केल्याचीही चर्चा सुरू आहे. म्हाडाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर मात्र शिरूर मतदारसंघावर दावा करणाऱ्या आढळरावांची भाषा काहीशी नरमाईची झाल्याचं दिसून येतंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याच्या मागे आपण ठाम राहू, त्याचा प्रचार करू अशी भूमिका आढळरावांनी घेतली आहे.असं असलं तरीही आढळरावांनी अद्यापही आपल्या उमेदवारीची आशा सोडली नाही. कारण या मतदारसंघावर दावा केलेल्या अजित पवार कुणाला उमेदवारी देणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.