काँग्रेस अध्यपदाच्या निवडणुकीसाठी शशी थरूर सज्ज! 30 तारखेला दाखल करणार अर्ज, गेहलोत यांची काय आहे तयारी?
Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. तब्बल दोन दशकानंतर काँग्रेस पक्षाध्यक्षपद हे गांधी घराण्याबाहेर जाणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.
Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. तब्बल दोन दशकानंतर काँग्रेस पक्षाध्यक्षपद हे गांधी घराण्याबाहेर जाणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. अशातच खासदार शशी थरूर हे 30 सप्टेंबर रोजी या निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल करणार आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी मंगळवारी सांगितले की, शशी थरूर यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या कार्यालयाला कळवले आहे की ते 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करतील.
याबाबत माहिती देताना मिस्त्री पुढे म्हणाले की, आम्ही काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार निवडणुका होतील. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांना कोण आव्हान देणार असा प्रश्न विचारला जात आहे. अशातच त्यांच्या विरुद्ध पवन बन्सल हे उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात, अशी चर्चा आहे. बन्सल यांनी उमेदवारी फॉर्म घेतला अस्ताला असल्याचं सांगण्यात येत आहे.
एबीपी न्यूजशी बोलताना पवन बन्सल यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. त्यांनी सांगितलं की, अध्यक्षपदासाठी माझ्या उमेदवारीचा प्रश्नच उद्भवत नाही. चंदीगडला जाण्यापूर्वी मी दोन फॉर्म घेतले होते. मी कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसाठी फॉर्म घेतलेले नाहीत, असं ही ते म्हणाले आहेत. मात्र मग त्यांनी हे फॉर्म का घेतले आहेत? असा ही प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. ज्यावर अद्याप त्यांच्याकडून स्पष्ट असं काहीच सांगण्यात आलेलं नाही.
याबाबत बोलताना मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, पवन बन्सल यांनी नामांकन फॉर्म घेतला आहे. मात्र त्यांनी हा फॉर्म दुसऱ्या कोणासाठीही घेतला असू शकतो, असं त्यांनी सांगितलं. पत्रकारांशी बोलताना मिस्त्री म्हणाले की, त्यांनी मंगळवारी सोनिया गांधी यांची त्यांच्या 10 जनपथ निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांचे मतदार ओळखपत्र त्यांना दिले. त्यांनी सोनिया गांधी यांना आतापर्यंतची प्रक्रिया, किती जणांनी उमेदवारी अर्ज घेतले, लोकप्रतिनिधींची माहिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं.
अशोक गेहलोत पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का?
शशी थरूर यांना पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आव्हान देतील, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली आहे. यातच गेहलोत यांनीही आपण निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची सुरुवात झालेली असताना गेहलोत यांनी अद्याप फॉर्म घेतलेला नाही. तसेच ते नेमकं कधी अर्ज दाखल करणार याबाबतही कोणतीही माहिती दिली नाही. यामुळे ते निवडणूक लढणावर की नाही? यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.