(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar: बाळासाहेब ठाकरेंसोबत मिळून मासिक काढलं, सिद्धिविनायकाच्या चरणी ठेवलं होतं, पण पुन्हा ते कधी दिसलंच नाही: शरद पवार
Maharashtra Politics: शरद पवार हे चार दिवस कोल्हापूरमध्ये तळ ठोकून राहणार आहेत. आज त्यांच्या उपस्थितीत समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश होणार आहे. कोल्हापूरातील महाराष्ट्र दिनमान वृत्तपत्र शुभारंभ कार्यक्रमाला शाहू महाराज, शरद पवार, सतेज पाटील, समरजित घाटगे उपस्थित होते.
कोल्हापूर: मला एखाद्याने पुस्तक भेट म्हणून दिलं तर मी ते कव्हर काढल्याशिवाय कधीच घेत नाही. कारण मागे एकदा असचं मला कोणीतरी पुस्तक भेट दिले होते. मी घरी जाऊन कव्हर उघडून पाहिलं तर आतमध्ये गोळवळकर यांचं पुस्तक होते. तेव्हापासून मी कधीच कव्हर काढल्याशिवाय पुस्तक घेत नाही, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. ते मंगळवारी कोल्हापूरमध्ये (Kolhapur)महाराष्ट्र दिनमान वृत्तपत्राच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज, सतेज पाटील, समरजित घाटगे आदी नेते उपस्थित होते.
यावेळी शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मी तरुणपणात असे काही उद्योग केले होते, त्यात नेता नावाचं साप्ताहिक काढले होते. त्याचे 5 ते 6 अंक निघाले पुढे त्याचे अंक निघाले नाहीत. त्यानंतर मी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आणखी दोन मित्रांनी राजनीती नावाचे मासिक चौघांनी काढायचे ठरवले होते. चौघांनी 5-5 हजार काढून हे मासिक काढले. काहींनी सांगितलं की, हे मासिक सिद्धिविनायकाच्या चरणी ठेवा, पाहायला मिळणार नाही, इतका खप होईल. आम्ही ते मासिक सिद्धिविनायक चरणी अर्पण केले, पण तो अंक कधी दिसलाच नाही. मात्र, आता विजय चोरमारे यांनी हातात घेतलेलं काम यशस्वी होईल, यात शंका नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
केशवराव भोसले नाट्यगृहासाठी एक कोटींचा चेक देईन: शरद पवार
शरद पवार यांनी मी केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केल्याचे सांगत या नाट्यगृहाच्या डागडुजीसाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. मी केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली. मी आता सतेज पाटील आणि सगळ्यांना विनंती करतो की, आता जे काही कराल ते उत्तम दर्जाचे नाट्यगृह बनवा. अनेक कलाकारांना मान आणि उंची मिळवून देणारे हे नाट्यगृह होते.
आता कलाकारांची काळजी घेणारं नाट्यगृह उभे करा. मुख्यमंत्र्यांनी नाट्यगृहासाठी 20 कोटी जाहीर केल्याचे मी ऐकले. पण त्यासाठी आणखी निधी लागेल. लोकप्रतिनिधींनीबी आपल्या निधीतून नाट्यगृहासाठी खर्च केला पाहिजे. माझ्या निधीतून एक कोटीचा चेक उद्या केशवराव भोसले नाट्यगृहासाठी पाठवला जाईल. सर्वच लोकप्रतिनिधींनी आपला निधी द्या, कोण नाही म्हटलं तर माझ्यावर सोपवा, असे शरद पवार यांनी म्हटले.
शरद पवारांच्या कोल्हापूर दौऱ्यावर श्रीकांत शिंदेंची टिप्पणी
शरद पवार पुढील चार दिवस कोल्हापूरमध्ये मुक्काम करणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीही भाष्य केले. तेदेखील सध्या कोल्हापूरमध्ये आहेत. त्यांनी म्हटले की, निवडणुका आल्या की काही लोक इकडे तिकडे येत जात असतात. त्यामुळे काही लोक बाहेर पडल्याने महायुतीवर काही परिणाम होणार नाही. महायुती भक्कम आहे. महायुतीचे सगळे आमदार, इच्छुक उमेदवार काम करत आहेत, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.
आणखी वाचा
शरद पवारांना भेटताच के. पी. पाटलांचा 180 डिग्रीचा टर्न, अजितदादांसोबत काडीचा संबंध नसल्याचा दावा