Raj Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचं स्थान काय? शरद पवारांनी दोन वाक्यात प्रत्युत्तर दिलं
Sharad Pawar:आज या भागातील शेतकरी कांद्यावरुन अस्वस्थ आहे. तरीही पंतप्रधान मोदी कांद्याच्या मुद्द्यावर काही बोलणार नसतील तर कोणीतरी बोलणारच. यापूर्वी नाशिकच्या लोकांनी राजकीय सभेत कांदे फेकले आहेत. येथील लोक जागरुक आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले.
नाशिक: शरद पवार यांनी पूर्वीच्या काळात अनेक राजकीय पक्ष फोडले. त्यामुळे आता शरद पवारांचा पक्ष फुटला आहे, अशी टीका करणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी खोचक भाषेत प्रत्यु्त्तर दिले आहे. ते गुरुवारी नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeay) यांनी केलेल्या टीकेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी म्हटले की, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे यांचे नक्की काय स्थान आहे हे माहिती नाही. मी ऐकलंय की, नाशिक हा त्यांचा बालेकिल्ला आहे. पण हल्ली ते नाशिकमध्ये दिसत नाहीत. या दोन वाक्यांच्या पलीकडे शरद पवारांनी राज यांच्याबद्दल बोलणे टाळले.
या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींबाबतचा एक किस्सा सांगितला. पूर्वी एकदा मोदी मला म्हणाले होते की, मला तुमच्यासोबत इस्रायलच्या दौऱ्यावर येण्याची इच्छा आहे, मला घेऊन चला. मी त्यांना इस्रायलला घेऊन गेलो. इस्रायलमध्ये कृषी तंत्रज्ञान आणि इतर सर्व गोष्टी सविस्तरपणे समजावून सांगितल्या. हे सर्व माहिती असताना आज मोदी जे बोलत आहेत, ते माझ्या मते राजकारण आहे. ते मुख्यमंत्री होते तेव्हा राज्याच्या विकासात त्यांना जेन्युईन इंटरेस्ट होता पण आता त्यांना जेन्यूईन इंटरेस्ट राजकारणात आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात धार्मिक आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बोलत आहेत. मोदींचा आत्मविश्वास ढासळला आहे. परिणामी मोदी भरकटले आहेत, असे पवारांनी सांगितले.
मी राज्यभरात फिरत आहे. मला महाविकास आघाडीसाठी अनुकूल ट्रेंड आहे. लोक बदलासाठी तयार आहेत. भाजप आणि तत्सम शक्ती यांना बाजूला ठेवावं, हे मत विशेषत: शेतकरी वर्गाचे आहे. जनमत भाजपसोबत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
मोदींच्या रोड शो वर शरद पवारांची टीका
मुंबईसारख्या शहरात रोड शो करणं, शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांना तासनतास थांबाव लागते, वाहतूक कोंडी होते. मोदींनी रोड शो घेतला होता, तो भाग प्रामुख्याने गुजराती आहे. मोदींना रोड शो करायचाच होता, तर मुंबईत मोठे रस्ते असलेला भाग होता. पण मोदींचं लक्ष्य विशिष्ट वर्ग होता. मात्र, त्यामुळे लोकांना त्रास झाला, अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली.
आणखी वाचा
पवारांकडून फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात, ठाकरेंनी मनसेचे नगरसेवक खोके-खोके देऊन फोडले : राज ठाकरे