मला खात्री आहे, 'त्या' गृहस्थांबद्दल केंद्राला आज ना उद्या निर्णय घ्यावा लागेल : शरद पवार
Satara News : या गृहस्थांनी (राज्यपाल) ज्या पद्धतीचे उद्गार शिवछत्रपतींबद्दल काढले ते चुकीचे होते. मला खात्री आहे आज ना उद्या केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागेल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.
Satara News : "महाविकास आघाडीचा मोर्चा (MVA Morcha) हा सत्ताधाऱ्यांनी महापुरुषांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून असेल. यामध्ये सर्वसामान्यांचा संताप दिसेल", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं. ते कराडमध्ये (Karad) एबीपी माझाशी बोलत होते. या गृहस्थांनी (राज्यपाल) ज्या पद्धतीचे उद्गार शिवछत्रपतींबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) काढले ते चुकीचे होते. मला खात्री आहे आज ना उद्या केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागेल. तो बदल झालेला कदाचित आपल्याला पाहायला मिळेल, असं शरद पवार म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई न करता, केंद्र आणि राज्य सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली असा आरोप शरद पवारांनी केला.
मोर्चाला परवानगी मिळेल यात शंका नव्हती (Maha Vikas Aaghadi Morcha)
"मोर्चासाठी परवानगी मिळाली याबाबत मला आश्चर्य वाटत नाही. लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, हे काल मुख्यमंत्री म्हणाले होते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांची बघ्याची भूमिका आहे याबद्दल लोकांच्या मनात संताप आहे. मी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं होतं, ते म्हणाले होते मोर्चा हा लोकशाहीत अधिकार, त्यामुळे परवानगी मिळेल यात शंका नव्हती. एकच आहे, लोकांमध्ये राग आहे, डॉ. आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्याबाबत जबाबदार माणसांनी केलेली वक्तव्ये सामान्य माणसांना अस्वस्थ करणारी आहेत. त्याची प्रतिक्रिया उद्या मोर्चात दिसेल.
उदयनराजेंची भूमिका चांगली (Sharad Pawar on Udayanraje Bhosale)
उदयनराजेंनी भूमिका चांगली घेतली. त्याबाबत समाधान आहे. पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जी काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्याबाबत लोकांमध्ये संताप आहे, असं शरद पवार म्हणाले.
राज्यकर्त्यांना तारतम्य नाही
आंबेडकर, फुले, कर्मवीरांबाबत जी वक्तव्ये केली त्याबाबत लोकांमध्ये संताप आहे. कर्मवीरांनी भीक मागितली म्हणता हे संतापाचं आहे, दुर्दैवी आहे. त्याबाबतचं राज्यकर्त्यांना तारतम्य नाही. कर्मवीर भाऊराव पाटलांनी मुलांना जेवायचा प्रश्न आला तेव्हा स्वत:च्या पत्नीच दागिने विकले ते काय भीक मागून नव्हे, असं शरद पवार म्हणाले.
राज्यपालांबाबत केंद्राला निर्णय घ्यावा लागेल (Sharad Pawar on Governor)
या गृहस्थांनी (राज्यपालांनी) शिवरायांबद्दल जे उद्गार काढले, त्याबाबत केंद्राला आज ना उद्या निर्णय घ्यावा लागेल. तो बदल झालेला कदाचित आपल्याला पाहायला मिळेल.
VIDEO : Sharad Pawar on MVA Morcha : महापुरुषांच्या अपमानामुळे जनता नाराज - शरद पवार