''ते कधी मराठ्यांच्या मोर्चात दिसले नाहीत, ना कधी मराठा आरक्षणाबद्दल ब्र शब्द काढला''
विरोधकांनी मराठा-ओबीसी आरक्षणाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यानंतर राधाकृष्ण विखेपाटील यांनी सभागृहातून नाव न घेता थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला
मुंबई : राज्यात आरक्षणाचा प्रश्न जटील बनला असून ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याने महायुतीतील प्रमुख नेत्यांनी शरद पवारांसह काँग्रेस, शिवसेनेवरही हल्लाबोल केला होता. विशेष म्हणजे विधिमंडळ अधिवेशनातही याये पडसाद पाहायला मिळाले. मराठा आरक्षणासंदर्भात विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेवरुन सत्ताधारी चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांना दोन्ही समाजातील तेढ कायम ठेऊन आपली राजकीय पोळी भाजायची आहे, असा आरोपही महायुतीच्या नेत्यांनी केला. त्यातच, राज्याचे महसूलमंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil) यांनी नाव न घेता थेट शरद पवारांवरच (Sharad Pawar) हल्लाबोल केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सभागृहात चांगलाच राडा पाहायला मिळाला. यावेळी, विरोधकांनी मराठा-ओबीसी आरक्षणाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यानंतर राधाकृष्ण विखेपाटील यांनी सभागृहातून नाव न घेता थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला. ''लोकांना झुलवत ठेवणे हे षडयंत्र आहे. चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने कधी मराठा आरक्षणावर ब्र काढला नाही. कधी मोर्चात दिसले नाहीत'', असे म्हणत शरद पवार हे मराठा आरक्षणावरही कधीही भाष्य करत नाहीत, असे विखे पाटील यांनी म्हटले.
पुढे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ''अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने आज मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल कधी ब्र शब्द काढला नाही, कधी ते मराठा समाजाच्या मोर्चात दिसले नाहीत, मराठ्यांच्याबद्दल कधी सकारात्मक भूमिका घेतली नाही. खरं म्हणजे यापूर्वी सरकारने दिलेलं मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणाच्या विधेयकाचं कायद्यात रुपांतर केलं. सर्वोच्च न्यायालयात ते आरक्षण टिकलं. पण महाविकास आघाडीच्या काळात त्यांचे मुख्यमंत्री फक्त फेसबुकवर होते. त्यामुळे ते आरक्षण गेलं'', असे राधाकृ्ष्ण विखे पाटील यांनी म्हटले. तसेच, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनाही त्यांनी आवाहन केलं आहे.
विखे पाटलांचं जरांगेंना आवाहन
मराठा समाजाच्या आरक्षणाचा नेमका शत्रू कोण, आरक्षण कोण देत नाहीत, हे मनोज जरांगे यांनी ओळखलं पाहिजे, पाटील यांनी अशा लोकांचे गावबंद केले पाहिजे, असे म्हणत जरांगे यांनाही विखे पाटलांनी आवाहन केलं आहे.
मनोज जरांगेंची 11 जुलै रोजी बीडमध्ये रॅली
दरम्यान, मनोज जरांगे यांनी सध्या शांतता रॅली काढली असून हिंगोलीतून त्यांनी आपल्या शांतता रॅलीला सुरुवात केली होती. त्यानंतर, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर करत आज धाराशिवमध्ये त्यांची रॅली पोहोचली असून या रॅलीतून ते सरकारला इशारा देत आहेत. तसेच, ओबीसी नेत्यांवरही हल्लाबोल करत आहेत. 11 जुलै रोजी बीड जिल्ह्यात त्यांची शांतता रॅली निघणार आहे. त्यासाठी, जिल्ह्यात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
हेही वाचा
अंबानींचं लग्न, शिवसेना-भाजपात जुंपली; तेजस ठाकरेंच्या डान्सवरुन सुषमा अंधारेंचा तिखट पलटवार