शरद पवारांचा नवनिर्वाचित खासदार ॲक्शन मोडमध्ये, शासकीय जमिनींवरील अनधिकृत बांधकामांची पाहणी
Bhiwandi Suresh Mhatre : खासदार होताच बाळ्या मामा ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी काल्हेर येथील शासकीय जमिनींवर केलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी केली.
भिवंडी : भिवंडी लोकसभा (Bhiwandi Lok Sabha) मतदारसंघात खासदार म्हणून सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) उर्फ बाळ्या मामा (Balya Mama) निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी ॲक्शन मोडवर आले आहेत. बाळ्या मामा यांनी बुधवारी काल्हेर येथील शासकीय जमिनीवर केलेल्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांची यांनी पाहणी केली. यावेळी सुरेश म्हात्रे यांनी म्हटलं आहे की, जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आहे. त्यामुळे येथील शेतकरी आणि जनसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मुख्य जबाबदारी माझ्यावर आहे. काल्हेर येथे सुमारे 26 एकर शासकीय सोबतच वनविभाग आणि स्थानिक नागरिकांच्या जमिनीवर नागरिकांना दमदाटी करून आणि अतिक्रमण करून येथील बांधकाम व्यावसायिक श्रीधर पाटील, भरत पाटील, नितीन पाटील यांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलं आहे, असंही ते म्हणाले.
शरद पवारांचा नवनिर्वाचित खासदार ॲक्शन मोडमध्ये
या अनधिकृत बांधकामासाठी माजी खासदार कपिल पाटील आणि त्यांचा पुतण्या देवेश पाटील यांच्या नावाने हे बांधकाम व्यावसायिक येथील शेतकरी आणि नागरिकांना धमकावत जमिनींवर अतिक्रमण केले असून येथील स्थानिक गुंडांना हाताशी धरून बांधकाम व्यावसायिक जनतेची फसवणूक करत आहेत, असा आरोप खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी यावेळी केला आहे.
शासकीय जमिनींवरील अनधिकृत बांधकामांची पाहणी
या प्रकरणी आपण स्वतः तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, एमएमआरडीए यांच्याकडे तक्रार करणार असून या प्रकाराची सर्व कागदपत्र आपण शासकीय यंत्रणेला सोपविणार आहोत, असेही बाळ्या मामा यांनी यावेळी सांगितलं आहे. येथील बांधकाम व्यावसायिक जमिनीचे खोटे कागदपत्र दाखवून मध्यमवर्गीय गुंतवणूक करणाऱ्या कुटुंबीयांना घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना फसवत असून दादागिरी आणि दहशत वाढवली जात आहे.
आता गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही
शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर मी इथे येऊन पाहणी केली असून मी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की, मी निवडून आलो की, दुसऱ्याच दिवशी या जागेची पाहणी करणार आणि तिसऱ्या दिवशी तक्रार करून जनतेला न्याय देणार असल्याचे सांगितलं. निवडणूक जिंकल्यावर आज घरी शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागलेली असताना ते कार्यक्रम आटोपते घेऊन या ठिकाणी येऊन अनधिकृत बांधकामांची पाहणी केली असल्याचेही खासदार सुरेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितलं आहे. केवळ केंद्रीय मंत्र्यांच्या आशीर्वादाने शासकीय यंत्रणा या अनधिकृत बांधकामांवर दुर्लक्ष करत आले आहेत, मात्र आता असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देखील बाळ्या मामा यांनी दिला आहे.