Prashant Jagtap : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर मी राजीनामा देईन, राजकारणातून बाहेर पडेन; शरद पवार गटाच्या नेत्याचा एल्गार, कारण हि सांगितलं!
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून बाहेर पडेन.” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध दर्शवला आहे.

Pune News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय समीकरणे तयार होताना दिसत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार गटातील कार्यकर्ते काही ठिकाणी एकत्र येऊन निवडणूक लढवतायेत. अशीच समीकरणे येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीतही पाहायला मिळू शकतात. मात्र, या शक्यतेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी ठाम विरोध दर्शवला आहे.
प्रशांत जगताप म्हणाले, “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून बाहेर पडेन.”ते पुढे म्हणाले, “अजित पवार यांनी पक्ष सोडला तेव्हा आम्ही शरद पवारांसोबत उभे राहिलो, अनेकांचा विरोध सहन केला, सरकारविरोधात आंदोलन केली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर झालेल्या टीकेला आम्ही उत्तर दिलं. आणि आता निवडणुका तोंडावर आल्यावर एकत्र लढण्याचा विचार कसा काय? अजित पवारांना माहीत आहे. एकत्र लढलो तर पुण्यात त्यांची किती जागा येऊ शकतात.” असे म्हणत प्रशांत जगताप यांनी ठाम विरोध दर्शवला आहे.
मीही पुणेकरांच्या हक्कासाठी लढणारा कार्यकर्ता
जगताप यांनी पुढे बोलताना सांगितले की, दोन्ही गटातील काही कार्यकर्ते एकत्र लढण्याचे प्रयत्न करत असले तरी हा पर्याय त्यांना मान्य नाही. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या ट्विट बद्दल जगताप यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “धंगेकर पुणेकरांच्या प्रश्नांवर नेहमी लढत उभे राहतात. त्याचप्रमाणे मीही पुणेकरांच्या हक्कासाठी लढणारा कार्यकर्ता आहे.”
Ravindra Dhangekar: वेळ पडली तर मी प्रशांत जगतापांच्या घरी जाईल, त्यांना समजवेल
दरम्यान, प्रशांत जगताप यांच्या या वक्तव्यावर माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं कि, प्रशांत जगताप हे पुण्यातील राजकारणाचे मोठं नाव आहे. ते महापौर राहिलेत. पीएमपीएमएलचे अध्यक्ष राहिलेत. पुणेकरांच्या हितासाठी ते नेहमीच उभे राहिलेत. त्यांनी राजकारणातून बाहेर पडू नये, असा सल्ला मी मित्र म्हणून त्यांना देतोय, असे ते म्हणाले. वेळ पडली तर मी प्रशांत जगतापांच्या घरी जाईल, त्यांना समजवेल, असेही ते म्हणाले. पक्षात वरच्या नेत्यांनी काहीही निर्णय घेऊ द्या, कार्यकर्त्यांनी आपण नेहमी दोन पावलं माग घेतली पाहिजे.
Ravindra Dhangekar : रूपाली ठोंबरे पाटील जर शिवसेनात येत असतील तर त्यांचं स्वागत
अजित पवार गटाच्या रूपाली ठोंबरे पाटील नुकत्याच शिवसेना शिंदे गटाचे खासदार शशिकांत शिंदे यांना भेटल्या. रूपाली ठोंबरे पाटील जर शिवसेनात येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. ती माझी लहान बहीण सारखीच आहे. रूपाली ठोंबरे पाटील शिवसेनेत आल्याने आमची ताकद नक्कीच वाढेल. तर निलेश राणेंनी जे काय केलं ते योग्य होतं, मी त्यांच्यासोबत आहे. मात्र त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होतो हा कुठला न्याय? असा प्रश्नही रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केलाय. लोकशाही राहिली आहे का नाही? ज्यांनी पैसे दाखवले त्यांच्या विरोधातच गुन्हा दाखल होतो. असेही ते म्हणाले.

























