शरद पवार ''मॅन ऑफ द सिरीज''; निकालानंतर राष्ट्रवादीच्या आमदाराने शरद पवारांचे पाय धरले
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आनंद व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत राज्यात 13 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला
मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये देशात आणि राज्यातही यंदा काही अंशी बदलाचे वारे पाहायला मिळाले. देशात भाजपच्या जागा घटल्या असून राज्यातही महायुतीला मोठा फटका बसला. त्यामुळे, राज्यात भाजप महायुतीचा (Mahayuti) स्ट्राईक रेट चांगलाच घसरला आहे. राज्यातील महायुतीच्या विजयाचे शिल्पकार म्हणून शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंकडे पाहिले जाते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतरही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मोठ्या विश्वासाने व हिंमतीने लोकसभा निवडणुकीत प्रचार केला. शरद पवार यांनी तब्बल 60 पेक्षा जास्त सभा घेऊन निवडणूक प्रचारात आघाडी घेतली होती. त्यांच्या या सभांचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नक्कीच झाल्याचं दिसून आलं. त्यामुळेच, शरद पवार हेच मॅन ऑफ द सिरीज असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आ हे.
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आनंद व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत राज्यात 13 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही 8 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे, निश्चितच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट वाढला आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. शरद पवारांचे चरणस्पर्श करतानाचा व्हिडिओ शेअर करत, जितेंद्र आव्हाड यांनी ही इज 'मॅन ऑफ द सिरीज' असे म्हणत शरद पवारांचं लोकसभा निवडणुकीतील योगदान विशद केलं आहे.
बारामतीमधून माझ्या राजकारणाची सुरूवात झाली, त्यामुळे बारामती मतदारसंघामध्ये आम्हाला चांगलं लीड मिळालं, राज्यात ठाकरे-काँग्रेस आणि आम्ही जीवाभावाप्रमाणे लढलो असं शरद पवार निवडणूक निकालानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले. देशाचा निकाल हा परिवर्तनाला पोषक असून पुढची दिशा ही इंडिया आघाडीच्या बैठकीत होईल, असेही पवार म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये, काँग्रेस 13, शिवसेना 9 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा मिळाल्या आहेत. तर, महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामध्ये, भाजपला 9, शिंदेंच्या शिवसेनेला 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागा जिंकता आली.
He is the man of the series
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 4, 2024
His name is #SharadPawar pic.twitter.com/a9v72Pa6y1
शरद पवार यांची भूमिका यंदाच्या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही शरद पवार यांनी 80 व्या वर्षी सभांचा धडका लावून निवडणुकीत चमत्कार घडवून आणला होता. त्यानंतर, 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्येही पवारांनी उमेदवारांसाठी जीवाचं रान लावून प्रचार केला. कारण, या निवडणुकीत अनेक जवळेच त्यांच्याविरुद्ध उभे होते. स्वत:चा पुतण्याच शरद पवारांविरुद्ध राजकीय मैदानात खिंड लढवत होता. त्यामुळे, ही निवडणूक पद व प्रतिष्ठा दोन्ही पणाला लागलेली होती. तसेच, नात्यांवरील विश्वालाही जनमताचा कौल काय मिळणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, बारामतीकरांनी सुप्रिया सुळेंना निवडून देत शरद पवारांवरील विश्वास कायम असल्याचे सिद्ध केले. त्यामुळेच, शरद पवार हे महाविकास आघाडीच्या विजयाचे शिल्पकार आणि मॅन ऑफ द सिरीज ठरले आहेत.