Devendra Fadnavis: सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना सोबत साधा फोटोही काढू दिला नाही, शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदासाठी वेगळीच नावं: देवेंद्र फडणवीस
MVA CM Face for Vidhan Sabha Election 2024: शरद पवारांच्या डोक्यात आता मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा चेहरा नाही. उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी ते दिल्लाला गेले होते, असे फडणवीस यांनी म्हटले.
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पाहत नाहीत. शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची अलीकडच्या काळातील वक्तव्ये पाहता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हा मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसावा, असे मला वाटत असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. ते शुक्रवारी 'टीव्ही ९ मराठी' कॉनक्लेच्या व्यासपीठावरुन बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन (CM Face of MVA) सुरु असलेल्या स्पर्धेबाबत विचारण्यात आले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे मध्यंतरी तीन दिवस दिल्लीला गेले होते. मुख्यमंत्रीपदासाठी मविआने त्यांचा चेहरा पुढे करावा, हा त्यांचा प्रयत्न होता. एरवी आम्ही दिल्लीत गेलो की, ठाकरे आमच्यावर किती टीका करतात. किंबहुना आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. पण उद्धव ठाकरे दिल्लीत गेले तेव्हा त्यांची सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीचा एकही फोटो बाहेर आला नाही. सोनिया गांधी यांनी ठाकरेंना एकही फोटो काढून दिला नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांच्या डोक्यात काहीतरी शिजतंय: फडणवीस
उद्धव ठाकरेंच्या मनात होतं की, मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचा चेहरा समोर ठेवून महाविकास आघाडीने निवडणूक लढवावी. पण शरद पवार यांनी स्पष्ट केलं की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार नाहीत. काँग्रेसच्या नाना पटोले यांनीही त्याची री ओढली. मला असं वाटतं की, पवार साहेबांच्या डोक्यात मुख्यमंत्री कोणाला करायचं, हे जवळजवळ शिजतंय. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील, त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही. मी शरद पवारांच्या डोक्यात कोण नाही, हे सांगू शकतो. पण शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदासाठी कोण आहे, हे सांगणं फार कठीण आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
काँग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकीचा सर्व्हे लीक झाला, असे बोलले जाते. पण सर्व्हे असे लीक होतात का? काँग्रेसने टेबलावर बसून हा सर्व्हे केला होता. उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी काँग्रेसचा हा सर्व्हे लीक करण्यात आला, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
आणखी वाचा