ठाकरे बंधुचं स्टेटमेंट चुकीचं नाही; 6 जुलैच्या मोर्चात सहभागी होण्याबाबत शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
माझ्यामते या सगळ्यांचा जो आग्रह आहे तो, प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीची करू नये असा आहे. 5 वीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही.

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सुत्रीचा अवलंब करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाला मनसेनं पहिल्यापासूनच तीव्र विरोध केला असून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेऊन सरकारची भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकारची भूमिका आपणास मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मनसेची री ओढली असून हिंदीला विरोध नाही, पण पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले. आता, मराठी (Marathi), हिंदी भाषेच्या मुद्द्यावरुन राज-उद्धव या ठाकरे बंधुंच्या वक्तव्यावर आता शरद पवारांनी (Sharad pawar) आपली भूमिका मांडली आहे. ठाकरे बंधुंचं स्टेटमेंट चुकीचं नाही, असे शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, 6 जुलै रोजीच्या मोर्चातील सहभागावरही भाष्य केले.
माझ्यामते या सगळ्यांचा जो आग्रह आहे तो, प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीची करू नये असा आहे. 5 वीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही. देशातील एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो, त्यामुळे हिंदी भाषेला एकदमच साईडचं समजण्याचं कारण नाही. पण, लहान मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये किती भाषा ते आत्मसात करू शकतात. त्यांच्यावर किती भाषांचा लोड टाकावा लागेल याची देखील विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. दुसऱ्या भाषेचा लोड टाकला आणि मातृभाषा बाजुला पडली तर हे योग्य नाही, म्हणून 5 वी पर्यंतच्या हिंदी भाषेचा हट्ट सरकारने सोडावा, असा सल्लाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.
ठाकरे बंधुंचं स्टेटमेंट चुकीचं नाही
ठाकरे बंधु जे बोलतात त्यांचे स्टेटमेंट काही चुकीचं नाही. त्यामध्ये, कोणत्या स्टेजला हिंदी हवी आणि नको ह्या दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे, मराठी भाषेवरुन एकत्र येण्यासाठी ते भूमिका घेत असतील तर मातृभाषेच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.
आमचा अॅप्रोच निगेटीव्ह नाही
राज ठाकरेंनी आवाहन केलेल्या 6 जुलै रोजीच्या मोर्चाला तुम्ही जाणार का? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, हे तुम्ही मला सांगताय पण मला ते माहिती नाही. कुठलाही एक राजकीय पक्ष सामूहिक भूमिका घेऊ शकत नाही. ते म्हणाले इतर राजकीय पक्षांसोबत बोलणार आहे, ते बोलू द्या मग निर्णय घेऊ. पण, आमचा अॅप्रोच निगेटीव्ह नाही, असे उत्तर शरद पवारांनी दिले.
6 जुलै रोजी मोर्चा, राज ठाकरेंची भूमिका
“पहिलीपासून हिंदीसक्ती होऊ देणार नाही, त्याविरोधात येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. मराठी हाच अजेंडा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत ते. महाराष्ट्राची संपूर्ण ताकद 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवर दिसेल. अशावेळी मला हेही बघायचं आहे, या मोर्चात कोण सामील होतंय आणि कोण येणार नाहीत, हे देखील मला बघायचं आहे. शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञांशी आम्ही बोलणार आहोत. सर्व विद्यार्थी, पालकांना आम्ही मोर्चाला आमंत्रण देणार आहोत. सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत ते. हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. आम्ही महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत. कोणताही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे तुम्हाला ६ जुलैला कळेल…”, असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा
मोठी बातमी : राज ठाकरेंची गर्जना, 6 जुलैला मुंबईत भव्य मोर्चा, हिंदीविरोधात आर-पारची लढाई























