Nilesh Lanke: जुना शिवसैनिक खासदार, उद्धव ठाकरेंचा आनंद गगनात मावेना, निलेश लंके मातोश्रीबाहेर येऊन काय काय म्हणाले?
Maharashtra Politics: अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे-पाटील यांना पराभवाची धूळ चारली होती. यानंतर निलेश लंके मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले होते.
मुंबई: मी खासदार झाल्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. एका सामान्य कुटुंबातील शिवसैनिक खासदार झाला ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, असे उद्धव साहेबांनी म्हटले. त्यांच्या मनात माझ्यासारख्या कार्यकर्त्याविषयी भावना होतीच, असे वक्तव्य अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केले. निलेश लंके यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी निलेश लंके यांनी उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा नगरमधून करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी आम्ही नगरमध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करु. मी उद्धव साहेबांची भेट घेतल्यानंतर त्यांना सांगितले की, साहेब मी नगरमधून 12 पैकी 12 आमदार निवडून आणण्याचा नारा दिला आहे. उद्धव साहेबांनी लोकसभा निवडणुकीत माझ्या प्रचारासाठी येता न आल्याबद्दल खंत बोलून दाखवल्याचे निलेश लंके यांनी म्हटले.
बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य आठवतं, ८० टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण. बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन मी प्रवास माझ्या राजकारणाचा सुरू केला होता. शिवसेनेत शाखाप्रमुख, गटप्रमुख, तालुकाप्रमुख अशी सगळी पदं मी भुषविली. मी खासदार म्हणून निवडून आलो, याचा उद्धव ठाकरे यांनासुद्धा खूप आनंद झाला. महाविकास आघाडीच्या एवढ्या जागा निवडून आल्यामुळेही ते समाधानी आहेत, असे लंके यांनी सांगितले.
सुजय विखेंवर लंकेंचा निशाणा
सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर मतदारसंघातील 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सुजय विखेंची याचिका फेटाळली होती. याबद्दल बोलताना निलेश लंके यांनी म्हटले की, काही लोकांना त्यांचा पराभव मान्य नाही. त्यामुळे ते असले रिकाटेकडे उद्योग करत आहेत. त्यांना जे करायचं ते करु द्या, मी माझ्या कामाला सुरुवात केली आहे, असे निलेश लंके यांनी म्हटले.
मातोश्री बाहेर झळकले निलेश लंकेंच्या स्वागताचे बॅनर
निलेश लंके यांच्या स्वागतासाठी मातोश्रीबाहेर स्वागताचे बॅनर झळकले होते. या बॅनरवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून निलेश लंके यांचा उल्लेख करण्यात आला होता. निलेश लंके यांच्या प्रचारात शिवसेना ठाकरे गटाचा मोठा वाटा होता. त्यामुळे आज नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत मातोश्रीवर जाऊन लंके यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
आणखी वाचा