नितीन गडकरी म्हणाले,...तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला नसता, शरद पवार कौतुक करत म्हणाले त्यांनी जाणकारांचा सल्ला....
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेतली.
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेला संबोधित केलं. बदलापूर येथील लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच प्रकरण आणि सिंधुदुर्गमध्ये मालवणमध्ये राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या दोन्ही घटनांवर शरद पवार यांनी भाष्य केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मालवणच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामध्ये स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर पुतळा पडला नसता, असं मत व्यक्त केलं होतं, याबाबत शरद पवार यांनी भाष्य केलं.
नितीन गडकरी बारकाईनं काम करतात...
शिवाजी महाराजांचा पुतळा स्टेनलेस स्टीलचा बनवला असता तर पुतळा पडला नसता, असं नितीन गडकरी म्हणाले होते. यासंदर्भातील प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी गडकरी यांंचं कौतुक केलं. केंद्र सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यात गडकरी एक मंत्री आहेत. एखादं काम घेतलं तर ते बारकाईनं काम करतात, स्वत:ला गुंतवून घेतात. कामाचा दर्जा चांगला राहील याची काळजी घेतात. पुणे कोल्हापूर, कोल्हापूर बेळगाव रस्त्याबाबत न सांगितलेलं बरं ते सोडून इतर ठिकाणी रस्ते सुधारत आहेत, त्या सुधारणेत गडकरींचं योगदान आहे हे संसदेतही सांगतो, इथं काही राजकारण आणायचं कारण नाही.गडकरींनी मत व्यक्त असेल तर जाणकारांचा सल्ला घेऊन त्यांनी मत व्यक्त केलं असेल असं वाटतं, असं शरद पवार म्हणाले.
सिंधुदुर्गमधील पुतळ्याचं काम दिलं त्यांना अनुभव नव्हता...
सिंधुदुर्गातील मालवणचा तो ऐतिहासिक परिसर आणि तिथं उभा करण्यात आलेला पुतळा, त्या पुतळ्याचं काम ज्यांनी काम केलं त्यांचा या क्षेत्रातील अनुभव अत्यंत मर्यादित होता असं दिसतंय. तेवढं मोठं काम त्यांनी केलेलं नाही असं दिसतंय. हे असताना त्यांच्यावर जबाबदारी टाकल्यानं अपघात घडेल अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली, असं शरद पवार म्हणाले. आज मुख्यमंत्री किंवा बाकीचे सहकारी सांगतात वाऱ्याचा वेग असा असा होता. पण अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रकिनारी पुतळा 1960 साली उभारला त्याला काही झालं नाही. अशी अनेक उदाहरण देता येतील. शिवाजी पार्कजवळ महाराजांचा पुतळा आहे, समोर पार्क आहे आणि मागं समुद्र आहे.त्यामुळं जी काही कारणं सांगितली जातात ती काही योग्य आहेत, असं दिसत नसल्याचं शरद पवार म्हणाले. ज्यांना काम दिलं त्यांना अनुभव नव्हता, मोठं काम त्यांना देणं योग्य नव्हतं. जे काय घडायचं ते घडलं. महाराष्ट्र असो की देशभरात शिवछत्रपती यांच्याबाबत आस्था असलेली लोकं दु: खी आहेत, असं शरद पवार म्हणाले.
इतर बातम्या :