Sharad Pawar: मोदींच्या रुपाने नवा पुतीन नको, शरद पवारांचा हल्लाबोल, नवनीत राणांच्या उमेदवारीबद्दल अमरावतीकरांची जाहीर माफी!
Maharashtra Politics: मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतोय. देशावर एक मोठं संकट आहे. आताच्या पंतप्रधानांकडे व्हिजन नाही. ते फक्त नेहरु आणि काँग्रेस पक्षावर टीका करतात.
अमरावती: देशाचे आजचे पंतप्रधान कुठेही गेल्यानंतर जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका करतात. संसदेमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी (PM Modi) जातात तेव्हा सत्ताधारी पक्षाचे खासदार मान खाली घालून बसतात. त्याठिकाणी एकप्रकारची दहशत त्या ठिकाणी दिसून येते. या देशात मोदींच्या रुपाने नवीन 'पुतीन' तयार होत आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. ते सोमवारी अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
मी अनेक नेत्यांना जवळून पाहिलं आहे, जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर मी सगळे पंतप्रधान पाहिले. नेहरुंची भाषणं नवा भारत कसा निर्माण करायचा, यावर असायची. आताच्या पंतप्रधानांच्या भाषणात नेहरु आणि काँग्रेसवर टीका असते. त्यांच्यात दृष्टीकोनाचा अभाव दिसतो, अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली.
उत्तर प्रदेशमध्ये खासदार जाहीरपणे बोलतात की, संविधान बदलायचे असेल तर मोदींना मतदान करा. देशात ही जी हुकूमशाही आली आहे त्याला घालवण्यासाठी संविधान मजबूत केलं पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे हा देश सुरक्षित राहिला. त्याचे रक्षण करणे आमचे काम आहे. त्यादृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.
शरद पवारांनी मागितली अमरावतीकरांची माफी
गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अमरावतीमधून निवडून आल्या होत्या. मात्र, नंतरच्या काळात नवनीत राणा भाजपच्या जवळ गेल्या आणि आता त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत. याच मुद्द्यावरुन शरद पवार यांनी अमरावतीकरांची जाहीर माफी मागितली. त्यांनी म्हटले की, मला अमरावती करांची माफी मागायची आहे. पाच वर्षांपूर्वी निवडणुकीमध्ये मी मतदान करा अशा सभा घेतल्या आणि पाठिंबा दिला खासदार केले. मात्र, त्यानंतर जे झाले ते पाहून मी अस्वस्थ होतो. मला खूप वेळा वाटलं की, अमरावतीमध्ये जावो आणि अमरावतीकरांची माफी मागावी, असे शरद पवार यांनी म्हटले.
पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी समाधानकारक नाही: शरद पवार
शरद पवार यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीविषयी नाराजी व्यक्त केली. निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. मात्र, मतदान समाधानकारक झाले नाही. गडचिरोलीत 70 टक्के मतदान झाले, नागपूरमध्ये फक्त 54 टक्के मतदान झाले, नागपूरमध्ये फक्त 54 टक्के मतदान झाले, म्हणजे तुम्हाला समजायला हवे. अमरावतीमध्ये 80 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले पाहिजे, असे आवाहन शरद पवार यांनी मतदारांना केले.
आणखी वाचा