रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एक मंत्र्याचे नाव पुढे; कुणालाच नको असेल तर मला द्या, संजय शिरसाटांची स्पष्टोक्ती, म्हणाले..
रामटेक बंगल्याची चंद्रशेखर बावनकुळेंकडून अदलाबदल करत हा बंगला पंकजा मुंडे यांना देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पुढे आली असताना या बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एका मंत्र्यांचे नाव पुढे आले आहे.
मुंबई : मलबार हिल परिसरात असणारा सर्वात टुमदार बंगला म्हणजे रामटेक बंगला. मंत्र्यांइतकाच सतत चर्चेत राहणारा आणि बातम्यांमध्ये झळकणारा हा बंगला. देवगिरी बंगला आणि सागर बंगला यांच्या बरोबर मध्ये असणारा आणि विशेष म्हणजे या दोन्हीपासून 'समान अंतर' राखून असणारा हा बंगला. मलबार हिल परिसरातला सी-फेसिंग असणारा हा बंगला कुणालाही हवाहवासा वाटेल असाच. पण सध्या हा बंगला मंत्र्यांना नकोसा वाटू लागल्याची चर्चा आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या बंगले वाटपात हा बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना मिळालाय. पण बावनकुळेंना रामटेकवर मुक्काम हलवण्यात राम वाटत नसल्याची चर्चा आहे. या बंगल्यात राहायला जावं की नाही, असा प्रश्न त्यांना पडल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे या रामटेक बंगल्याची बावनकुळेंकडून Chandrasekhar Bawankule) अदलाबदल करण्याची चर्चा सुरू आहे. हा बंगला पंकजा मुंडे यांना देण्यात येणार असून बावनकुळे या बंगल्याची अदलाबदल करणार असल्याचे सांगितले जातं आहे. तर दुसरीकडे रामटेक बंगला घेण्याची मुंडेंचीही तयारी असल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असताना रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एका मंत्र्यांचे नाव पुढे आले आहे.
बंगला कुणालाच नको असेल तर मला द्या, मी राहातो- संजय शिरसाट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी रामटेक बंगल्यासंदर्भात भाष्य करताना म्हणाले की, हा बंगला कुणालाच नको असेल तर मला द्या, मी जातो तिथे राहायला. आता आम्हांला फ्लॅट दिलेत, पण कुठे ना कुठे अॅडजस्टमेंट करावी लागते. असे ते म्हणाले आहे. रामटेक बंगला चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आला आहे, तर पंकजा मुंडे यांना बंगला मिळावा म्हणून त्यांनी पत्र लिहिलं आहे. आता शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून ही रामटेक बंगलीबद्दलची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एका मंत्र्यांचे नाव पुढे आले असून या बंगल्यात नेमकं कोण मुक्काम करणार हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
Ramtek Bungalow History : रामटेक बंगल्याच्या इतिहास
विलासराव देशमुख
सन 1995 ला रामटेकमध्ये विलासराव देशमुख वास्तव्यास असतानाच त्यांचा मोठा पराभव झाला.
छगन भुजबळ
आघाडी सरकारच्या काळात भुजबळांना हा बंगला मिळाला. त्यानंतर तेलगी प्रकरणात भुजबळांचं नाव समोर आलं. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
एकनाथ खडसे
युती सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनंतरचे वजनदार मंत्री म्हणून एकनाथ खडसेंना हा बंगला मिळाला. त्याच वर्षी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांना बंगल्यासोबतच मंत्रिपदावरही पाणी सोडावं लागलं.
दिपक केसरकर
शिंदे सरकारमध्ये केसरकरांना हा बंगला मिळाला होता. मात्र नव्या सरकारच्या मंत्रिमंडळातून केसरकरांना डच्चू मिळाला.