Sanjay Raut on Devendra Fadnavis: फडणवीसांनी शिवसेना फोडण्याचा जीआर काढला तरी मराठी माणूस एकत्र, आम्हाला जीआरच्या गोष्टी सांगू नका; संजय राऊतांचा पलटवार
Sanjay Raut on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी जीआर काढल्यामुळे शिवसेनेची स्थापना झालेली नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut on Devendra Fadnavis: दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ नये असा काही जीआर आम्ही काढला नाही, त्यांनी एकत्र यावं आणि किक्रेट खेळावं, जेवण करावं. आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केलाय.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, माझी काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांच्याशी पण चर्चा झाली. त्यानंतर असे ठरले की, वरळीला जे दोन सभागृह आहे तेथे पाच जुलैला विजयी मेळावा करावा. पण त्याचसोबत या कार्यक्रमासाठी शिवसेनेने आधी शिवतीर्थ मिळावे, यासाठी विनंती अर्ज केलेला आहे. कारण, मराठी माणसाचा हा सोहळा शिवतीर्थावर व्हावा, अशी आमची भूमिका होती. आमचा अर्ज अजूनही पेंडिंग आहे. अनिल परब त्यासाठी नक्कीच प्रयत्न करत आहेत. पण, हे सरकार आम्हाला परवानगी देणार नाही हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डोमचा पर्याय सुचवला आणि तो आम्ही स्वीकारला. त्या संदर्भात काल एक बैठक देखील झाली. त्या बैठकीमध्ये कार्यक्रमाचे स्वरूप कसे असावे? किती माणसे येतील? याबाबत चर्चा करण्यात आली. पाच जुलैला साधारण बारा ते साडेबाराच्या दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल. कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ठाकरे बंधू एकत्र येतील, याविषयी आता शंका असण्याचे कारण नाही, असे संजय राऊत म्हणाले.
म्हणून त्यांना आज जय महाराष्ट्र केला
संजय राऊत पुढे म्हणाले की, आम्हाला दिल्लीला दाखवायचे आहे की, जेव्हा जेव्हा दिल्लीने आघोरी कायद्यांच्या आधारे किंवा सत्तेच्या आधारे आमच्यावर हल्ले केले, तेव्हा महाराष्ट्र अधिक ताकदीने उसळून उभा राहिला. हे आम्हाला नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना दाखवायचे आहे. म्हणून त्यांना मी आज जय महाराष्ट्र केलेला आहे, असे त्यांनी म्हटले.
बरोबर बोलले ते त्यात चुकीचे काय?
उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीसंदर्भात राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत एक विधान केले. युती आणि आघाड्यांचा विचार निवडणुकांच्या वेळी करू. मराठी भाषिकांच्या या विजयाला कुठलेही पक्षीय लेबल लावू नका, असे त्यांनी म्हटले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, बरोबर बोलले ते त्यात चुकीचे काय? हा विषय आधीच चर्चेत आहे की या मोर्चात पक्षीय लेबल लावू नका.हे जरी खरे असले तरी या सोहळ्याचे आयोजन शिवसेना आणि मनसे एकत्रच करत आहे. दुसरे कोणी करत नाही. या संदर्भातल्या बैठका दोन पक्षातच होत आहेत. या संदर्भात चर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातच होत आहे, हे देखील दुर्लक्षित करता येणार नाही, असे त्यांनी म्हटले.
राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी जीआर काढल्यामुळे शिवसेनेची स्थापना झालेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जीआर काढल्यामुळे मराठी माणसे एकत्र आलेले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फोडण्याचा जीआर काढला तरीदेखील मराठी माणूस एकत्रच आहे. त्यामुळे जीआरच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका, असा पलटवार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
आणखी वाचा























