Sanjay Raut: अजितदादांची 1000 कोटींची संपत्ती क्लीन, सुनेत्रा वहिनी अन् पार्थ पवारांचं आभिनंदन; संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on Ajit Pawar: शपथ घेताच अजितदादांची एक हजार कोटीची संपत्ती मुक्तता केली, त्यामुळे मी पार्थ पवार, सुनेत्रा पवार, अजित पवार यांचेही अभिनंदन करतो असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली. अजित पवार यांना दिल्लीच्या बेनामी न्यायाधिकरणाने मोठा दिलासा दिला आहे. 2021च्या बेनामी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने जप्त केलेल्या त्यांच्या सर्व मालमत्ता काल (शुक्रवारी) मंजूर करण्यात आल्या. दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार अपिलीय न्यायाधिकरणाने हा निर्णय दिला आहे. न्यायाधिकरणाने त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियाविरुद्ध बेनामी मालमत्तेचे मालकीचे आरोप फेटाळून लावलेत. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. शपथविधी झाल्यानंतर लगेचच अजित पवारांना हा मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे. त्यावरती शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांचं भाजपवर हल्लाबोल केला आहे. शपथ घेताच अजितदादांची एक हजार कोटीची संपत्ती मुक्तता केली, त्यामुळे मी पार्थ पवार, सुनेत्रा पवार, अजित पवार यांचेही अभिनंदन करतो असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
अजित पवारासंह कुटूंबाचं अभिनंदन
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, बेकायदेशीर संपत्ती आहे. बेनामी आहे. भ्रष्टाचाराच्या पैशातून कमवलेली संपत्ती आहे. अजित पवार यांचा 70000 कोटीचा घोटाळा नरेंद्र मोदी यांनी बाहेर काढला होता, आम्हाला वाटलं हे आरोप ते सूड बुद्धीने करत आहेत. तेव्हा ही आमची भूमिका राहिली. त्यांच्या संपत्तीवर टाच आली आणि ताबडतोब काल मोदींच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा झाला, त्यानंतर काल केंद्र सरकारने आणि आयकर विभाग याच्यासह जे कोण असतील त्यांनी आमच्या प्रिय अजितदादांची एक हजार कोटींची संपत्ती ही स्वच्छ केली. मुक्त केली. त्याबद्दल अजितदादा पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचे मी खास अभिनंदन करतो, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
माझी स्वतःची संपत्ती नाही,तर राहतं घर...
महाराष्ट्रामध्ये अनेक आमच्या सहकाऱ्यांच्या अशा प्रकारच्या संपत्तीवरती आयकर विभागाने टाच आणली. पण ते फक्त भाजपला शरण गेले नाहीत म्हणून त्यांच्या संपत्ती या मुक्त केल्या नाहीत. मला असं वाटतंय, मलिक यांची देखील प्रॉपर्टी सोडवली जाईल. माझी स्वतःची संपत्ती नाही,तर राहतं घर देखील आयकर विभागांनी ताब्यात घेतलं. दोन रूम किचनचं माझं घर देखील त्यांच्या ताब्यात घेतलं. गावची चाळीस गुंठे वडिलोपार्जित जमीन आयकर विभागाच्या ताब्यात आहे. आम्ही त्यांना सांगतोय अधिकृत कष्टाचा पैशातून घेतलेली ही जागा आणि जमीन आहे. जी आम्हाला मुक्त करून द्या. पण नाही तुम्ही पक्ष सोडला तर आम्ही जप्त केला आहे ते मोकळा करू, पण आम्ही हे करायला नकार दिला. अजित पवार असतील प्रफुल पटेल असतील भाजपसोबत जातात. आठव्या दिवशी त्यांची 200 ते 250 कोटींची संपत्ती मुक्त होतं. दाऊद इब्राहिमशी संबंधित ती जमीन असल्याचा दावा केला आहे, भाजपसोबत गेल्यावर जप्त केलेली त्यांची संपत्ती ईडीने आठव्या दिवशी मोकळी केली. त्याच्याबद्दल आम्हाला आसुया नाही. त्यांना तुम्ही आता वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्यांच्या प्रॉपर्टी तुम्ही मोकळ्या केल्या, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
हजारो कोटींची संपत्ती त्या लोकांनी जप्त केल्यावर त्यांना पक्ष....
देशात आणि महाराष्ट्रात अनेक नेते आहेत. जे भाजपसोबत गेले आणि त्यांची संपत्ती त्यांना मिळाली. बेकायदेशीर संपत्ती आहे. बेनामी आहे. भ्रष्टाचाराच्या पैशातून कमवलेली संपत्ती असेल या सर्वांना भाजपने ताबडतोब मुक्त केले. हा आपला भाजपचा भ्रष्टाचाराचा झिरो टॉलरन्स आहे. मी यासाठीच अजित पवारांचा अभिनंदन करतो. ते फार अस्वस्थ होते. हजारो कोटींची संपत्ती त्या लोकांनी जप्त केल्यावर त्यांना पक्ष सोडावा लागला. आपल्या वडिलांसमान काकांच्या पाठीत खंजीर खूपसावा लागला. पण आज त्यांच्या चेहऱ्यावर विधानसभेत हास्य दिसेल. त्याबद्दल आम्हालाही आनंद आहे. पण, देशभरामध्ये अशा प्रकारच्या केलेल्या कारवायातून ज्या संपत्ती जप्त केलेल्या आहेत. ती सुद्धा संपत्ती अभ्यासपूर्वक आणि काळजीपूर्वक मोकळी करावी असं माझं मत आहे, पण त्यासाठी भाजपमध्ये जाण्यासाठी भाग पाडू नका असा आवाहन आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंनी, अजित पवारांनी, प्रफुल पटेल यांनी पक्ष का सोडला?
एकनाथ शिंदेंनी, अजित पवारांनी, प्रफुल पटेल यांनी पक्ष का सोडला, या दबावासाठीच सोडला, हा जो विजय भाजपला मिळालेला आहो तो मिळवणं सोपं नाहीये, तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर चौथ्या दिवशी तुमची 1000 कोटीची जप्त केलेली संपत्ती अशाप्रकारे मोकळे केली जाते, आठ दिवस थांबा, एवढी घाई काय आहे, लोकांना विसरू द्या. निर्लज्जपणाचा हा सर्व कारभार सुरू आहे असा हल्लाबोल देखील पुढे संजय राऊत यांनी केला आहे.