संजय राऊतांनी मातोश्रीबाहेर आंदोलन करणाऱ्या मुस्लीम आंदोलकांची कुंडली बाहेर काढली, एकनाथ शिंदेंचे भाडोत्री लोक असल्याचा दावा
Sanjay Raut : शिवसेना ठकारे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मुस्लीम समाजाच्या संघटनांनी आंदोलन केले होते. यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.
मुंबई : शिवसेना ठकारे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मुस्लीम समाजाच्या संघटनांनी जोरदार आंदोलन केले होते. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर उद्धव ठाकरेंची भूमिका काय? असा सवाल विचारत मुस्लीम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली होती. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मातोश्रीबाहेर आंदोलन करणाऱ्या मुस्लीम आंदोलकांची थेट कुंडलीच बाहेर काढली.
संजय राऊत म्हणाले की, जे लोक मातोश्री बाहेर आंदोलन करत होते. हे सगळे सुपारी गँगचे मेंबर आहेत. मातोश्री बाहेर आंदोलन करणारे लोक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे लोक होते. मातोश्री बाहेर दंगा करणारे अकबर सय्यद हे मुख्यमंत्र्यांसोबत आहेत. हे लोक गुन्हेगार आहेत. सध्या राजकारणात सुपारीचा मोठा बिझनेस सुरू आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी मातोश्रीबाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटोच माध्यमांना दाखवले.
मातोश्रीबाहेर दंगा करणारे माणसं मुख्यमंत्र्यांची भाडोत्री
ते पुढे म्हणाले की, हे आंदोलक शिंदे यांचे भाडोत्री होते. या सुपारीबाबांचे खेळ वर्षा बंगल्यावर, मंत्रालयाचा सहावा मजला आणि ठाण्यातून चालतात. मातोश्रीच्या बाहेर दहा-वीस लोक आले आणि घोषणाबाजी करून गेले. काहीही कारण नव्हते. अद्याप वक्फ कायदा किंवा या बिलातील सुधारणा याबाबत पार्लमेंटमध्ये चर्चा होणे बाकी आहे. त्याआधीच मुंबईतले आणि महाराष्ट्रातले वातावरण खराब करण्यासाठी मिंधे गटाच्या लोकांनी मातोश्रीवर काही मुस्लिम समाजाची लोक पाठवली. हे सगळे त्यांच्याबरोबर आहेत. सर्व त्यांचे भाडोत्री आहेत. बाकी सर्व मुसलमान बांधव महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहेत, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
हिंमत असेल तर अहमदशाह अब्दालीला आव्हान द्या
हे सगळे सुपारी गँगची माणस आहेत. या सगळ्यांचे नेते अहमदशहा अब्दाली आहेत. अहमदशाह अब्दाली महाराष्ट्रात मराठी माणसात भांडण लावण्याचे काम करत आहेत. हिंमत असेल तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अहमदशाह अब्दाली आव्हान द्यायची भाषा करा, असे आव्हान त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या