Sanjay Raut : मोदी-शाहांशी आमचं वैयक्तिक भांडण नाही, आमचं भंडण महाराष्ट्रद्रोह्याशी; संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल
Sanjay Raut: मुंबईत आज ठाकरे गटाचं शिबीर आहे, वर्धापनदिनानिमित्त घेतलेल्या शिबिरात संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Sanjay Raut : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे गटाचं मुंबईत शिबीर आहे आणि या दरम्यान संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. शिंदे गटाच्या पोस्टरबाजीवरुन देखील राऊतांनी खिल्ली उडवली आहे. शिंदे गटातले लोक म्हणतात, वाघ निघाले गोरेगावला. पण मुंबईसह महाराष्ट्रातील सगळे वाघ तर माझ्यासमोर उपस्थित आहेत, मग गोरेगावला जातंय कोण? असा मिश्कील सवाल राऊतांनी केला. तर, 'वाघाची कातडी पांघरून लांडगे निघाले गोरेगावला' हे वाक्य शिंदे गटासाठी योग्य असल्याचं राऊत म्हणाले.
'मोदी-शाहांशी आमचं वैयक्तिक भांडण नाही'
मोदी-शाहांशी आमचं वैयक्तिक भांडण नाही, तर आमचं भंडण महाराष्ट्रद्रोह्याशी आहे, महाराष्ट्राला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांशी आहे, असं म्हणत संजय राऊंतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केली. मुंबईतील सर्व उद्योग महाराष्ट्राबाहेर नेण्याचं काम सुरू असल्याचं राऊत म्हणाले.
'हिंमत असेल तर निवडणूक घ्या'
जेपी नड्डा, अमित शाह यांसारखे बरेच नेते केंद्रातून मुंबईत येत आहेत, मुंबई का कब्जा लेंगे म्हणत आहेत. हिंमत असेल तर निवडणूक घ्या, असं राऊत यावेळी म्हणाले. मुंबई क्रिकेटची पंढरी आहे, पण ते महत्त्व सुद्धा आता कमी करून हे क्रिकेट गुजरातमध्ये साकारत असल्याचं राऊत म्हणाले. मुंबई क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाची असताना सर्वात मोठं मोदी स्टेडियम यांनी गुजरातला बांधलं, असं बोलून राऊतांनी सरकारवर टीका केली.
'निवडणूक आयोगाला खोके देऊन तारीख घेतली का?'
शिंदेंच्या शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे. पक्ष बनून एक वर्ष होत नाही, तर 59वा वर्धापन दिन ते साजरा करत असल्याचं राऊत म्हणाले. तुम्हाला शिवसेनेच्या जन्माची तारीख माहीत नाही, म्हणून निवडणूक आयोगाला खोके देऊन तारीख विकत घेतली का? असा सवाल देखील राऊतांनी शिंदे गटाला केला.
'दो मस्ताने चले देश डुबाने'
मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात लूट सुरू असल्याचं राऊत पुढे म्हणाले. 'दो मस्ताने चले जिंदगी बनाने, चुना लगाके पुरा देश डुबाने' अशी शेरोशायरी करत राऊतांनी सरकारवर चांगलाच घणाघात घातला आहे. जसे दोन मस्ताने दिल्लीत, तसे दोन मस्ताने आता महाराष्ट्रात असल्याचं राऊत म्हणाले. केंद्रात आणि राज्यात बसून मुंबई, महाराष्ट्र बुडवण्याचं काम सुरू आहे, असं देखील राऊत म्हणाले.
'88 हजार कोटी रुपये नक्की गायब कसे झाले?'
नाशिक, बंगळुरू आणि मध्य प्रदेशमध्ये नोटा छापण्याचे सरकारने कारखाने आहेत आणि तिथून 88 हजार कोटी रुपयांच्या नोटा बेपत्ता झाल्या. नोटांचे भरलेले ट्रक गेले कुठे? असा सवाल यावेळी राऊतांनी केला. तर, महाराष्ट्रात झालेल्या सत्तापालटाच्या खेळात तर हे पैसे वापरले नाहीत ना? असा सवाल त्यांनी केला. तर, हा फोडाफोडीचा खेळ महाराष्ट्रात अजूनही सुरू असल्याचं राऊत म्हणाले.
'बाईंना घाई फार होती, आल्याही घाईत आणि गेल्याही घाईत'
फोडाफोडीच्या राकारणावेळी आपल्याकडून एक बाई गेल्या, त्या आल्याही खूप घाईत आणि गेल्यापण घाईघाईत असं म्हणत राऊतांनी मनिषा कायंदेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.
'शिवसेना केवळ एकच'
डुप्लिकेट माल खूप असतात, मात्र खरी शिवसेना एकच, असं म्हणत राऊतांनी शिंदेंना चिमटा काढला. आपला पक्ष हा अब्दूल सत्तारांचं बोगस बियाणं नाहीये, तर हे बाळासाहेब ठाकरेंचं अस्सल खरं बियाणं आहे, असं संजय राऊत म्हणाले. आमची शिवसेना कोणाला चोरता येणार नाही, आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहे, असंही राऊत पुढे म्हणाले.
हेही वाचा:
आमचं सरकार आल्यावर मोदी-शाह-फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील - संजय राऊत