Sangli News : भाजपच्या दोन नेत्यांमध्ये मनोमिलन, खासदार संजयकाका पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात दिलजमाई
Sangli News :
Sangli News : सांगली (Sangli) लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकत जहरी टीका केलेल्या भाजपच्या दोन नेत्यांमध्ये अखेर मनोमिलन झाले आहे. खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) या दोन नेत्यांमध्ये हे झालेले मनोमिलन सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. आटपाडीमध्ये खासदार संजयकाका पाटील यांचे खंदे समर्थक आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे मित्र अनिल पाटील यांनी पडळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात या दोन नेत्यांना एकत्र आणलं. यात दोन्ही नेत्यांनी दोघांमधील वादाला तिलांजली देत असल्याचे दाखवून दिले. या दोन नेत्यांच्या एकत्र येण्याने जिल्ह्यातील भाजपा नेत्यांमधील अंतर्गत वाद थांबण्यास आणि गटातटात कार्यकर्त्यांची होणारी विभागणी थांबण्यास मदत होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत हे दोघेजण एकमेकांविरोधात उभे होते. संजयकाका पाटील भाजप कडून तर गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडी लोकसभा लढवली होती. निवडणूक निवडणूक प्रचारात तर दोघांनी एकमेकांवर जहरी टीका देखील केली होती. पण हा सगळा भूतकाळ विसरुन हे दोन नेते एकत्र आल्याने दोन्ही गटातील कार्यकर्ते मात्र सुखावले आहेत.
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही दोघे एक दिलाने काम करणार असल्याची ग्वाही खासदार संजय पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. आटपाडीचे अनिल पाटील यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात खासदार संजय पाटील व आमदार गोपीचंद पडळकर हे दोघे एकाच व्यासपीठावर आले होते.
राजकारणामध्ये माझ्यात आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात मनभेद कधीही नव्हते, यापुढेही नसतील, अशी ग्वाही खासदार संजयकाका पाटील यांनी आटपाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्या दरम्यान दिली आणि दोघांमधील वादाला तिलांजली दिल्याचे दिसून आले. आमदार गोपीचंद पडळकर यांनीही खासदार संजयकाका पाटील आणि आपण जिल्ह्याची आणि आटपाडी तालुक्याच्या विकासाची दोन्ही चाके होणार आहोत, असे म्हणत खासदार पाटील यांच्याशी मैत्रीपर्वाचे दुसरे पुष्प गुंफले.
काही वर्षांपासून दोघांची कट्टर विरोधक म्हणून ओळख
मागील काही वर्षांपासून खासदार संजयकाका पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये विळ्या भोपळ्याचे नाते निर्माण झाले होते. मागील लोकसभा निवडणूक एकमेकांविरोधात लढवली होती. सध्या दोघे एकाच पक्षात राहून देखील त्यांच्यातील दुरावा कमी होत नव्हता. पक्षाच्या बैठकीत देखील दोन्ही नेत्यांची भूमिका नेहमी एकमेकाविरोधात असायची. मात्र अलीकडच्या काही महिन्यापासून दोघेजण एकाच व्यासपीठावर बगायल मिळत होते. पडळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मात्र आटपाडीत दोघांना व्यासपीठावर अनिल पाटील यांनी आणून दोन कट्टर विरोधक एकत्र आल्याचे आणि दोघांमधील वादाला तिलांजली दिल्याचे जाहीरपणे दर्शन दिले.
एकत्र आल्यावर एकमेकांवर स्तुतीसुमने
'राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. गोपीचंद पडळकर हे एक चांगले नेतृत्व असून आम्ही दोघे एकत्र येऊन केंद्र आणि राज्य शासनाचा निधी आटपाडी तालुक्यासह सांगली जिल्ह्यामध्ये आणून विकासातून राजकीय मैत्री वाढवत राहू, असे संजयकाकानी म्हटले आहे. तर आटपाडी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी संजयकाका पाटील आणि मी एकत्रित काम करुन केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या वतीने भरघोस निधी आणणार आहोत. आटपाडी तालुक्यातील इंच ना इंच जमीन टेंभू योजनेच्या पाण्याखाली आणण्यासाठी आम्ही दोघेही प्रयत्नशील राहणार आहोत असे गोपीचंद पडळकर म्हणाले.